पनवेल : आपल्या वाढदिवसाला हार तुरे न घेता, लोकांची अविरतपणे व प्रामाणिक सेवा करणारे आमदार प्रशांत ठाकूर खऱ्या अर्थाने आदर्श लोकप्रतिनिधी असून त्यांच्या रूपाने चांगले आमदार लाभले हे पनवेलचे भाग्य आहे, असे प्रतिपादन ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता सुप्रसिध्द नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आज येथे केले. नेतेलोक दुसऱ्याला सांगतात,स्वतः ते करीत नाहीत. मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः अवयवदान संकल्प केला, त्यामुळे प्रशांत ठाकूर हे जनताभिमुख आमदार आहेत, असे गौरवोदगारही त्यांनी यावेळी काढले.
पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज(रविवार, दिनांक 06) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार तसेच जयपूर फुट महाशिबीर’ पार पडले. या शिबिराचे आठ हजारहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराचे उदघाटन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त गुच्छ न आणता मुख्यमंत्री शेतकरी सहायत्ता निधीत शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा म्हणून केलेल्या आवाहनानुसार अनेक नगरसेवक तसेच सामाजिक संस्था यांनी या कार्यक्रमात आपल्या योगदानाचे धनादेश आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनीही पाच लाख रुपयांचा धनादेश आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी डॉ तात्याराव लहाने व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात चष्मे वाटप,आणि श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.जवळ जवळ ३७ नागरिकांनी यावेळी अवयवदानाचा संकल्प केला असल्याचे कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा ठाकूर, परेश ठाकूर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, मी येथे यावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सतत आग्रह करीत होते, त्यांनी अखेर चार वर्षे पाठपुरावा करून मला या शिबिराला आणलेच. मोठ्या घरात असतानाही चांगले संस्कार घडतात याचे उदाहरण म्हणजेच आमदार प्रशांत ठाकूर हे असून प्रत्येक माणसाचा विचार करणारे ते आदर्श कर्तृत्व आहेत व त्यांना घडविण्याचे काम माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले, असे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांना समाजाच्या उत्कर्षासाठी दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. तसेच दरवर्षी या शिबिराला उपस्थित राहण्याचे तसेच तुमच्याकडून आलेल्या प्रत्येक रुग्णाचे उपचार मोफत करू, असे आश्वासनही डॉ.लहाने यांनी यावेळी दिले.
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी या शिबिरात आल्याचा आनंद झाल्याचे आपल्या भाषणात सांगतानाच या शिबिराचे आयोजन सुयोग्य योजनाबद्ध व उत्कृष्ट असल्याची पावती आयोजकांना आपल्या भाषणातून दिली. यावेळी त्यांनी बोलताना आरोग्याबाबत काही सूचनाही उपस्थितांना सांगितल्या. यामध्ये सकाळ व संध्याकाळी पाण्याने डोळे धुवावे, जंकफूड टाळा, कॊणत्याही आहाराचा अतिरेक करू नये, सहा वर्षाखालील बालकांना मोबाईल देऊ नये, धूम्रपान करू नये, व्यायाम करा, अशा मौल्यवान सूचना केल्या.
ते पुढे म्हणाले कि, आपल्याकडे लोकसंपत्ती आहे. दरवर्षी ८० ते ९० लाख लोकांचा मृत्यू होतो. भारताला २२ लाख डोळ्यांची गरज आहे, पण डोळे मात्र ५० हजारच मिळतात, त्यामुळे हि गरज पाहता नेत्रदान व अवयवदानाचे महत्व अधिक असून अवयवदानात अंधश्रद्धेचा अडसरपणा येत आहे. तो दूर होण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच माझ्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या, मला माझ्या आईने किडनी दिली, आज माझी आई ८६ वर्षाची आणि ठणठणीत आहे, असे स्वतःचे उदाहरणही त्यांनी दिले. अवयवदानातून सात जणांना जीवनदान मिळते त्यामुळे अवयवदानाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असेही डॉ. लहाने म्हणाले.
यावेळी त्यांनी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये निर्माण झालेल्या दरीवर बोलताना, दोघांनीही आपल्या संबंधात विश्वासहर्ता ठेवली पाहिजे असे सांगून डॉक्टरांनी रुग्णांकडे अधिक लक्ष तर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना विश्वासाचे सहकार्य दाखविले पाहिजे, तसेच दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मारहाण किंवा तोडफोड न करता न्यायासाठी पोलीस व न्यायालयाचा मार्ग निवडावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या शुभेच्छा व आशिर्वाद मला काम करण्याची प्रेरणा देते त्यामुळे सर्वांचे आभार मानत असून यापुढेही आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील. असे सांगतानाच तुमचा सक्रिय सहभाग हाच महाशिबीर यशस्वी होंण्याचे कारण आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून आरोग्य महाशिबीर, राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा, मल्हार महोत्सव, कबड्डी, शालेय साहित्य वाटप, मॅरेथॉन तसेच विविध क्रीडा स्पर्धा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमे सातत्याने आयोजित करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वसामान्य माणूस ते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने अशा जीवन प्रवासाचा आढावा आपल्या भाषणातून त्यांनी मांडला. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आजपर्यंत दिड लाख शस्त्रक्रिया केल्याचे आवर्जून नमूद करून लाखो जीवनाचे जीवन उज्वल केल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले. तसेच त्यांनी डॉ. तात्याराव लहाने यांचे आभार मानले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्याबाबत महापालिकेने सतर्क राहण्याचे आवाहन करून स्वच्छता अभियान नियमित राबविण्याच्या सूचना केल्या. डॉ. गिरीश गुणे यांनी केलेल्या सूचनेनुसार स्वाईन फ्लूचा धोका लक्षात घेऊन लोकांपर्यंत अल्पदरात लस उपलब्ध करून देण्यासाठी रोटरीच्या सोबतीने श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ काम करणार असून यामध्ये श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले.
यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, डॉ. रमेश पटेल, डॉ. कैलास जबादे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उपमहापौर चारुशीला घरत, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर, डॉ. गिरीश गुणे, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ए.आर.रहाटवीलकर, डॉ. श्री.गवळी, डॉ. शुभदा निल, एकनाथ देशेकर, विनोद साबळे आदी उपास्थित होते. पाहुण्यांचे स्वागत भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी.देशमुख, युवा नेते दशरथ म्हात्रे, रत्नप्रभा घरत, सुहासिनी शिवनेकर, अरुण सोळंकी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, आभार नगरसेवक प्रकाश बिनेदार, सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले.
या महाशिबीरात स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी अशा एकूण 250 हून अधिक वैद्यकीय तज्ञांमार्फत रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली. शिबीरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, ह्रदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी,नाक, कान व घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, आयुर्वेद अशा विविध आरोग्य तपासण्यांसह औषधोपचार देण्यात आले. तसेच नेत्र तपासणी व चष्मे वाटपही करण्यात येणार आले. त्याचबरोबरीने मोफत कॄत्रिम हात व पाय (जयपूर फुट कॅम्प) शिबीरही यावेळी संपन्न झाले.