मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतच्या मागण्यांसंदर्भातील महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीदरम्यानची बैठक निष्फळ ठरलीयं. परिणामी ठरल्याप्रमाणे बेस्टचे ३६ हजार कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जात आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त जो पर्यंत कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासन देत नाहीत, तो पर्यंत आमचा संप सुरूच राहणार असल्याची भूमिका बेस्ट कृती समितीनं घेतलीय. दरम्यान, आज मध्यरात्रीपर्यंत काहीही तोडगा निघू शकला नाही तर ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. बेस्ट कृती समितीने मात्र लेखी आश्वासनाचा आग्रह धरला आहे. ‘बेस्टचे कर्मचारी हे मुंबई महापालिकेचेच कर्मचारी आहेत. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची जबाबदारी मुंबई महापालिकेने घेतली पाहिजे’, अशी भूमिका बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी मांडली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतचे लेखी आश्वासन महापालिका आयुक्तांनी द्यावे अशी आग्रही मागणी राव यांनी केली. हे लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाणार नाही असा ठाम निर्धार राव यांनी व्यक्त केला आहे.
***
मुंबईकरांवर संप लादू नये
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये अशी कळकळीची विनंती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना या बैठकीत केली. आम्ही केलेली विनंती ऐकायची की नाही हे कर्मचाऱ्यांनी ठरवायचे आहे, आम्ही कर्मचाऱ्यांना जबरदस्ती करू इच्छित नाही असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकरांना बेस्टची सेवा मिळाली पाहिजे, मुंबईकरांवर बेस्टचा संप लादू नये. बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मात्र त्यासाठी आम्हाला काही अवधी लागणार आहे. बेस्ट सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. या संकटातून मार्ग काढावा लागणार आहे असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, येत्या १० तारखेला बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील असे तोंडी आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कृती समितीला दिले आहे.