सुजित शिंदे
नवी मुंबई: भारत सरकारच्या सागरमाला योजना कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशात अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्टस्, वॉटर टुरिझम, कोस्टल टुरिझम, रिलेटेड इनिशेटीव्ह अंतर्गत मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील मुलांना सेलींग आणि बोटींग, कायाकिंग, विंग सर्फिंग, टेलिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवी मुंबईतील मुलांनाही सदर योजनेचा लाभ मिळावा आणि त्याअनुषंगाने नवी मुंबईतही समुद्र प्रशिक्षण केंद्र उभारावे याकरिता बेलापूरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी संबंधित अधिकार्यांसमवेत सीबीडी, सेक्टर-15 येथील प्रस्तावित जागेची पाहणी केली. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय प्रकल्प सल्लागार अतुल कुलकर्णी, कॅप्टन स्वामीनाथन, प्रशिक्षक अमिष वेद, आदि उपस्थित होते.
नवी मुंबईतील मुलांनीही साहसी व्हावे, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे तसेच नवी मुंबईतून ऑलम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांसाठी या क्षेत्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत याकरिता प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबई विकसित शहर असून येथे अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची वानवा आहे. त्यासाठी येथील मुलांना प्रशिक्षणासाठी बाहेरील शहरात जावे लागत असे, त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर शुल्क भरावे लागत होते. पण, आता येथील मुलांची सदर गैरसोय दूर होणार असून येत्या काही दिवसात नवी मुंबईत समुद्र पर्यटन प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली. दरम्यान, समुद्र पर्यटन प्रशिक्षण केंद्र सुरु होणार असल्याने नवी मुंबईकर नागरिकांनी या सुविधेचे स्वागत केले असून त्यांनी आ.सौ. मंदाताई म्हात्रे यांचे यानिमिताने आभार मानले आहेत.