दिपक देशमुख
नवी मुंबई : रक्षाबंधनाच्या दिवशी घरोघरी बहीणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी जातात आणि औक्षण करताना आयुष्यभर आपली रक्षा करण्याचे वचन भावाकडून घेतात. पण नेरूळ सेक्टर सहा परिसरातील महिलांनी शिववाहतुक सेना, नवी मुंबई आणि शिवसेना शाखा 86च्या वतीने परिसरातील सफाई कामगारांना राख्या बांधत परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त केली.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष आणि प्रभाग 86मधील शिवसेना शाखाप्रमुख दिलीप किसनराव आमले यांनी या कृतज्ञता रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सफाई कामगार स्वच्छतेच्या कामास सुरूवात करत असल्याने संगिता आमले यांच्यासमवेत विभागातील महिला यावेळी उपस्थित होत्या. यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख गणपत शेलार आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटीलही उपस्थित होते.
या कार्यक्रमात सफाई कामगार सत्यवानमहाराज कालन व शिवसेना उपशहरप्रमुख गणपत शेलार यांनी आपल्या भाषणात रक्षाबंधन सोहळ्याचे आणि सफाईचे महत्व विषद केले.
कार्यक्रमाचे दिलीप आमले यांनी सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित केल्याचे सांगितले. सफाई कामगार सकाळपासून सांयकाळपर्यत सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात स्वच्छतेचे काम करत असल्यामुळे साथीच्या आजारांना या ठिकाणी खतपाणी मिळत नाही. या सफाई कामगारांच्या कामाला वंदन करण्यासाठी व त्यांच्या परिश्रमाला मान-सन्मान देण्यासाठी विभागातील महिला या ठिकाणी स्वेच्छेने या ठिकाणी सकाळीच मोठ्या संख्येने दाखल झाल्या असल्याचे दिलीप आमले यांनी सांगितले.