मुंबई : मुंबई विद्यापीठात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्याप विद्यापीठाला लावता आलेले नाहीत. विद्यापीठांच्या चुकांमुळे ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांच्या या नुकसानाला शिक्षणमंत्री आणि सरकार जबाबदार आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की शिक्षणमंत्री हे मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या विषयावर गंभीर नाहीत. त्यांनी विद्यापीठाच्या कामकाजावर लक्ष ठेवलं नाही म्हणून विद्यार्थ्यांवर ही वेळ आली आहे. शिक्षणमंत्र्यांनी निकालाची फायनल तारीख जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. पण अद्यापही त्यांना निकालाची तारीख जाहीर करता आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाचं पाप हे या सरकारचे आहे अशी टीका जयंत पाटील यांनी सरकारवर केली.