सार्वजनिक बांधकाम खात्याने केली डागडुजी
पनवेल : पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुरवस्थेबाबत संघर्ष समितीने उठविलेल्या आवाजानंतर सावर्जनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी तात्काळ डागडुजी केली. छप्पराला लागलेली गळती बंद करण्यासाठी ताडपत्रीचा आधार घेतला होता, ती काढून नवीन सिमेंटची पत्रे टाकण्यात आली आहेत. त्याशिवाय स्वच्छतागृहांची साफसफाई करून त्यांचीही दुरूस्ती करण्यात आली आहे.
पनवेल आयटीआयला लागलेल्या ग्रहणामुळे गेली अनेक वर्षे इमारतीची दुरवस्था झाली होती. पिलर मोडकळीस आलेले आहेत. छप्पर फुटल्याने खोल्यांमध्ये पाण्याचे तळे साचले आहे. स्वच्छतागहांना दरवाजे नाहीत. ती तुंबली आहेत. परिसरात अतिशय उकिडा निर्माण झाला आहे. दुर्गंधीने विद्यार्थी आणि निदेशक हैराण झाले आहेत. आयटीआयची किंमती यंत्रे पावसाच्या पाण्यात बुडाल्याने परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मृत्यूची तलवार लटकत होती. याबाबत संघर्ष समितीने आयटीआयचे राज्य संचालक अनिल जाधव, प्राचार्य एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य पिल्ले, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अधिकारी राहूल मोरे, उपअभियंता एस. एम. कांबळे, डांगे आदींची संयुक्त बैठक घेवून डागडूजी तात्काळ करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला होता.
परंतु, दोन्ही विभाग दूर्लक्ष करून कागदी घोडे नाचवत असल्याचा हलगर्जीपणा संघर्ष समितीच्या लक्षात येताच, तिथेच उपोषण सुरू करीत असल्याचे पत्र संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू, उपाध्यक्ष विजय काळे, माधुरी गोसावी, सदस्य पराग बालड, कविता ठाकूर, उज्वल पाटील, ऍड. संतोष सरगर, किरण घरत, मंगल भारवड, रमेश फुलोरे, शेख, भारती जळगावकर, सीमा पाटील आदींनी दिले होते.
त्यानंतर पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे यांच्याकडे प्राचार्य एस. व्ही. पाटील आणि सावर्जनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता डांगे यांनी लेखी पत्र देवून संघर्ष समितीच्या मागणीनुसार दुसर्याच दिवशी डागडुजी सुरू करीत असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी तात्काळ डागडुजीला प्रारंभ केला.
नव्या इमारतींसाठी संघर्षने पावले टाकली असून येत्या आठवडाभरात आयटीआयचे संचालक अनिल जाधव व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेवून ठोस मार्ग काढण्यात येणार आहे.