सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : एमजीएम शाळेतील विद्यार्थीनीचे प्रकरण घडल्यावर प्रसिध्दीचा झोत काही काळ आपणाकडे वळविण्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांनी आंदोलने, निदर्शने केली. परंतु पुढे सर्वांनाच याचा विसर पडला. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भगत यांना मात्र या घटनेचा आजही विसर पडलेला नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अशी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून त्यांचा प्रशासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासोबत विविध शाळांच्या मुख्याध्यापकांच्या भेटीगाठी घेवून या समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देत लवकरात लवकर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीवजा विनंती रवींद्र भगत करताना पहावयास मिळत आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा व सुरक्षितता वाढविण्याकरिता महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री.रविंद्र भगत यांनी महापालिका आयुक्त ,महापौर ,शिक्षण अधिकारी ,प्रशासन अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.
राकेश तांडेल, निलेश म्हात्रे, दर्शन म्हात्रे, भालचंद्र राउत या सहकार्यांसोबत नवी मुंबईतील सीबीडी,बेलापूर, अग्रोळी, दिवाळे, दारावे, करावे, नेरुळ, शिरवणे, सारसोळे, कुकशेत, शिवाजीनगर, सानपाडा, तुर्भे ,ऐरोली येथील महापालिकेच्या शाळांना भेट देऊन मुख्यध्यापकांना पत्र देऊन शालेय व्यस्थापन समितीमध्ये शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव मंजूर करून महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीस सादर करण्याची विनंती केली.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अतिरिक्त निधी नसेल तर त्या त्या प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. एकादी नागरी समस्या निवारणास विलंब झाला तरी चालेल, सुविधा मिळण्यास विलंब झाला तरी चालेल, परंतु शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थीनीची सुरक्षितता महत्वाची आहे, याबाबत रवींद्र भगत यांच्याकडून व्यक्तीगत पातळीवर जनजागृती अभियानही सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही रवींद्र भगत यांच्या मागणीला कितपत न्याय मिळतो याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.