सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : फुटबॉल बरोबरच आपल्याला क्रिकेट खेळाविषयी तेवढीच आत्मियता असून आपण कांगा लिग, हॅरिस-गाईज शिल्डसह इतरही टुर्नामेंट खेळलेलो आहे. खेळाचा विचार करता आपण बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती आणि कामावर जास्त भर दिलेला आहे. विशेष म्हणजे आगामी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) द्विवार्षिक निवडणूक बघता आपण या संघटनेत असो अथवा नसू, पण त्याबाबत गांभिर्याने विचार करणार असल्याचे सांगत शिवसेना युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ते स्वत: एमसीए निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार असल्याची शक्यता अप्रत्यक्षपणे वाशीत बोलताना वर्तवली.
दरम्यान, राज्यात शैक्षणिक संस्थांकडून अवास्तव वाढविण्यात आलेली फी, शाळा-कॉलेज प्रवेशाची बोंबाबोंब, मुंबई विद्यापीठाच्या निकालांना लागलेला विलंब बघता राज्यातील विद्यमान सरकारचा वचक या शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक गैरप्रकारांकडे आहे की नाही याकडे लक्ष देण्याची गरजही आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखविली.
नवी मुंबई प्रेस क्लब आणि मालवण कट्टाने पुरस्कृत केलेल्या माझगाव क्रिकेट क्लबने सन 2015-16 या वर्षात कांगा नॉकआऊट या स्पर्धेत विजेतेपद पटकावून अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया कांगा लिग स्पर्धेत प्रवेश मिळवला. त्या निमित्ताने या संघातील खेळाडूंचा सत्कार वाशीतील तुंगा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी, न्यु हिन्दु स्पार्टस् क्लबचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, संघाचे पुरस्कर्ते नगरसेवक किशोर पाटकर, माझगाव क्रिकेट क्लबचे सचिव शाह आलम शेख, क्रिकेट प्रशिक्षक विकास साटम आदि उपस्थित होते. याप्रसंगी नवी मुंबईचा महिला क्रिकेट संघ आणि 19 वर्षाखालील भारतीय महिला संघाचे प्रतिनिधीत्व करणारी वाशीतील प्रकाशिका नाईक यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
भारतात क्रिकेट आता गावागावात पोहोचलेले असून सर्वच स्तरावर भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला आहे. आता तर पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा क्रिकेट संघाने देखील वर्ल्ड कपमध्ये दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. त्यामुळे क्रिकेटचा विचार करता भविष्यात आपल्या देशाची इतर देशांबरोबर तुलना सोडा पण आपल्याच देशातील महिला आणि पुरुष क्रिकेट संघांमध्येच नंबर वनच्या रॅकींगसाठी चुरस निर्माण होईल, अशी शंका आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केली.
लंडनप्रमाणे मुंबईत कांगा लिग स्पर्धा ओलसर खेळपट्टीवर खेळविली जात असल्याने ही स्पर्धा खेळण्याची मजा काही औरच आहे. या स्पर्धेत देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू खेळत असल्याने स्पर्धेकडे वेगळ्या प्रकारे बघितले जाते. आपण भविष्यात एमसीए अंतर्गत क्रिकेट संघटनांमध्ये असलो अथवा नसलो तरीही क्रिकेट खेळासाठी हवे ते सहकार्य करु, अशी ग्वाही देखील ठाकरे यांनी उपस्थित क्रिकेटपटुंना दिली.
माझगाव क्रिकेट क्लबचे मुख्य पुरस्कर्ते आणि पाठीराखे नगरसेवक किशोर पाटकर यांनी यशस्वी क्रिकेटपट्टुंचे कौतुक करत नवी मुंबईच्या खेळाडूंमधील टॅलेंट हंट साठी एखादी स्पर्धा आयोजित करण्याचा आपला मनोदय असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. पी. व्ही. शेट्टी, शाह आलम शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन युवा क्रिकेटपटुंना शुभेच्छा दिल्या. कार्पामाचे आभार प्रदर्शन नगरसेवक किशोर पाटकर यांनी केले. तर क्रिकेट प्रशिक्षक विकास साटम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.