शिर्डी : शिर्डी येथील प्रसिद्ध संत श्रीसाईबाबा यांच्या देहसमाप्तीस दि.१८ ऑक्टोबर, २०१८ या दिवशी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. साई इतिहासातल्या या महत्वपूर्ण घटनेचे मोल साई संस्थान आणि विश्वभरातले समस्त साईभक्त यांच्यासाठी अनन्यसाधारण असे आहे. सहाजिकच या घटनेचा हा शतकी टप्पा संस्मरणीय पध्दतीने साजरा होण्यासाठी दि.०१ ऑक्टोबर, २०१७ ते दि.१८ ऑक्टोबर, २०१८ हा कालावधी “श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष” म्हणून साजरा करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने निश्चित केले आहे. या महत्वपूर्ण कालावधीचे गांभिर्य जाणून उत्तमोत्तम व दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने ठरविले आहे.
शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संस्थानतर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून देश-विदेशातील नामवंत तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचे कार्यक्रम शिर्डी येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
शताब्दी वर्षानिमित्त जे नामवंत कलाकार श्रीक्षेत्र शिर्डी येथे विनामूल्य कार्यक्रम करू इच्छित आहेत, अशांनी उपजिल्हाधिकारी (ई-मेल – dycoll.2@sai.org.in, मोबा.०७७२००७७२०५) व शताब्दी कक्ष (ई-मेल – shatabdi@sai.org.in, फोन – ०२४२३-२५८९०७) श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मा.डॉ. सुरेश हावरे, अध्यक्ष, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांनी केले आहे.