नवी मुंबई : जुईनगरमधील उद्यानासाठी आरक्षित भुखंड नवी मुंबईमध्ये प्रकाशझोतात येवू लागला आहे. स्थानिक रहीवाशांनी उद्यान पूर्ण होण्याअगोदरच माता रमाई आंबेडकर असे उद्यानाला फलक लावून नामकरणही केले होते. हाच फलक काढण्यासाठी महापालिकेचा अतिक्रमण विभाग येणार असल्याची कुणकुण लागताच जुईनगरमधील भीमसैनिकांनी रात्रभर जागता पहारा देत या नामफलकाशी छेडछाड करत भावनांचा अपमान न करण्याचा इशाराच एकप्रकारे जुईनगरमधील भीमसैनिकांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आपल्या कृतीतून दिला आहे.
जुईनगरमधील आंबेडकरी समाजाची संख्या लक्षणीय असून उद्यानाला स्थानिक जनतेने स्वंयस्फूर्तपणे माता रमाईचे नाव दिले आहे. त्यामुळे हे नाव आता भावनिक मुद्दा बनल्याने पुढेही अनेक दिवस भीमसैनिक हा ठिकाणी पहारा देण्याची शक्यता आहे.
जुईनगर सेक्टर 24 येथील महापालिकेच्या उद्यानावर लावण्यात आलेली माता रमाई आंबेडकर यांच्या नावाची पाटी काढण्याचा महापालिकेचा डाव भीमसैनिकांनी उधळवून लावला आहे. महापालिका व पोलीस प्रशासन मोठ्या फौज-फाट्यासह ही पाटी काढण्यात येत असल्याची खबर जुईनगर येथील स्थानिक रहिवाशांना लागली होती. मात्र महापालिकेचे पथक पोहोचायच्या आधीच आंबेडकरी जनतेचा उद्यानाला गराडा पडला.
जुईनगर सेक्टर 24 येथे महापालिकेच्या वतीने उद्यानासाठी एक भूखंड राखीव करण्यात आला आहे. त्यानुसार त्या जागेवर महापालिकेकडून उद्यान तयार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर याठिकाणी होणार्या उद्यानाला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांची आहे. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी राहिवाशांमधून उत्स्फूर्तपणे उद्यानाला माता रमाई आंबेडकर यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. परंतु काही स्थानिकांना हाताशी धरून उद्यान व उद्यानाला दिलेले नाव काढण्याची मागणी एका आंबेडकर विरोधी गटाकडून सुरू आहेत. याच गटाकडून महापालिकेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यानुसार रात्री नेरूळ येथे एका धार्मिकस्थळावर महापालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर महापालिकेचा मोर्चा जुईनगरच्या दिशेने येणार असल्याचे आंबेडकरी जनतेला कळताच सर्वांनी उद्यानाकडे धाव घेतली. माहिती मिळताच अवघ्या दोन तासांच्या काळात शेकडो आंबेडकरी अनुयायी व विविध संघटनांचे नेत्यांसह पदाधिकारी पोहचून त्यांनी जागता पहारा दिला. यात मोठ्या प्रमाणात महिलांसह लहान मुलांचा समावेश होता. यावेळी इंटकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत, आरपीआयचे नेते महेश खरे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत घटनास्थळी हजर होते. जुईनगर येथील घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ख्वाजामिया पटेल हे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पोहचून पहारा दिला. प्रबुद्ध सेवा संघाणे, जुईनगर. सेक्टर 2 बौद्ध सेवा संघ, सेक्टर 24,25,व 23 सह सानपाडा,नेरूळ, मधील आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने रात्रभर जागे होते.
चौकट
ऐक्याचे दर्शन
गेले अनेक वर्षांपासून विखुरलेल्या आंबेडकरी संघटना एकाच मंचावर एकत्र व्हाव्यात यासाठी अनेक जणांचे प्रयत्नल सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री माता रमाई आंबेडकर यांच्या नावाची पाटी काढण्यासाठी येत असल्याची खबर लागताच त्याचा विरोध करण्यासाठी इतर वेळी वेग-वेगळी आंदोलने करणार्या आंबेडकरी संघटना एकवटून प्रशासनाला ऐक्याचे दर्शन घडवले.