नवी मुंबई : दिपक देशमुख
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळांना प्रोत्साहन मिळावे आणि उत्सव आयोजनातून सामाजिक एकात्मभावना वृध्दींगत व्हावी याकरिता दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येत असतो. या अनुषंगाने मागील वर्षी सन 2016 मध्ये संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा 2016 चा पारितोषिक वितरण समारंभ 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार सौ. मंदा म्हात्रे, आमदार संदीप नाईक, आमदार नरेंद्र पाटील आदी मुख्य अतिथी म्हणून तसेच उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, परिवहन समिती सभापती प्रदीप गवस हे प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत. गतवर्षीच्या स्पर्धेमधून आकर्षक देखावा, समाजप्रबोधनात्मक विषयानुरूप सजावट, आकर्षक मूर्ती, स्वच्छता व शिस्तबध्दता या चार गटांमध्ये अनुक्रमे तीन आणि दोन उत्तेजनार्थ अशी प्रत्येक गटात पाच पारितोषिके बक्षिस रक्कम व स्मृतीचिन्हे स्वरूपात प्रदान केली जाणार आहेत. या चारही गटात सर्वोत्तम असणार्या पाच गणेशोत्सव मंडळांना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळे पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. गतवर्षी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहनपर सहभाग स्मृतीचिन्ह प्रदान केले जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व श्रीगणेशोत्सव मंडळांनी या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक तथा क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विशाल डोळस व उपसभापती रमेश डोळे आणि समिती सदस्यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार्या श्री गणेशोत्सव 2017 मध्ये पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या भूमिकेतून यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळांना प्रोत्साहन देण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले असून 21 ऑगस्टपर्यंत आपल्या नजिकच्या विभाग कार्यालयात स्पर्धा प्रवेशिका दाखल करून नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2017 मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.