नवी मुंबई : दिपक देशमुख
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरांची निर्मिती या घटकाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून सर्व विभाग कार्यालयांमध्ये महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली लोन मेळावे आयोजित करण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना या योजनेची माहिती व्हावी हा उद्देश नजरेसमोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या लोन मेळाव्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व आठ विभाग कार्यालयांत 2184 लोकांनी भेट देऊन या योजनेची माहिती घेतली. यामध्ये ऐरोली आणि दिघा विभाग कार्यालयात विशेष प्रतिसाद लाभला. या योजनेअंतर्गत नवीन गृहबांधणी अथवा नवीन घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतल्यास शासन विविध उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी 2.30 ते 2.67 लक्ष इतके अनुदान देणार आहे. सदर अनुदान हे बंकेमार्फतच लाभार्थ्यांना मिळणार आहे. पती, पत्नी व अविवाहित मुले असलेले कुटुंब या घटकाचा लाभ घेऊ शकतील. याकरिता भारताच्या कुठल्याही भागात कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे स्वतःचे मालकीचे घर असू नये असे पात्रतेचे निकष आहेत. तरी आपल्या जवळच्या बँकेमध्ये सदर योजनेची माहिती घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.