नवी मुंबई : दिपक देशमुख
अतिक्रमण विभागाने फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर साहित्य परत देण्याचे काही नियम निर्गमित केले आहेत. परंतु या नियमांना धाब्यावर बसवून ऐरोली विभाग कार्यालयाचे अतिक्रमण अधिकारी जप्त केलेले माल काही व्यावसायिकांना परस्पर पावती फाडून देत आहेत. त्यामुळे इतर व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकारामागे अर्थकारण तर होत नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून रोजच अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या नियमानुसार अतिक्रमण विभागाने जप्त केलेला माल कोपरखैरणे येथील डम्पिंग ग्राउंडवर नेवून ठेवला जाणे नियमाला धरून आहे. त्यानंतर मनपाच्या ज्या विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने साहित्य जप्त केले आहे. त्याठिकाणी पावती फाडून कोपरखैरणे विभाग कार्यालयात जाऊन आणलेली पावती दाखवणे गरजेचे आहे. त्यानंतर कोपरखैरणे विभाग कार्यालयाचे अधिकारी डंम्पिंग ग्राउंडला संपर्क करून जप्त केलेला साहित्य पुन्हा देण्याचे संकेत आहेत. जप्त केलेला साहित्य पुन्हा संबंधित व्यावसायिकांना देण्याचे असा मार्ग आहे.
शनिवारी ऐरोली विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने संध्याकाळी सातच्या सुमारास सेक्टर 4 व 5 परिसरातील कपड्याच्या दुकानासमोरील मोकळ्या जागेवर ठेवलेले साहित्य जप्त केले. मनपाच्या नियमानुसार ते साहित्य कोपरखैरणे डम्पिंग ग्राऊंडवर घेऊन जाणे नियमाला धरून होते. परंतु ऐरोली विभागाच्या अतिक्रमण अधिका़र्यांनी याचा कोणताही विचार न करता ऐरोली विभागानेच पावती फाडून ते साहित्य परत दिले. यामुळे इतर फेरीवाल्यांच्या मनात रोष उत्पन्न झाला आहे. दादा भोसले नावाच्या व्यावसायिकांनी सांगितले की, माझ्या हॉटेलसमोर टेबल ठेवले होते. ते अतिक्रमण विभागाने उचलले. त्यानंतर कोपरखैरणे डम्पिंग ग्राउंडला जाऊन मला आणावे लागले. एकाला एक न्याय व दुसर्याला एक नियम लावणे हे योग्य आहे काय असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे मनपा अधिकार्यांचे दुटप्पी धोरण बघावयास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा अधिकार्यावर मनपाने कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.