मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या निधनामुळे पक्षाचे एक उमदे व तडफदार नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद नजीक झालेल्या भीषण अपघातात संजय चौपाने घटनास्थळीच मृत्युमुखी पडले तर पुर्णेकर गंभीर जखमी होते. त्यांची मृत्युशी झुंज सुरू होती. हा लढवय्या कार्यकर्ता काळावर मात करून ही लढाई जिंकेल, अशी आशा चाहत्यांना होती. परंतु, पुर्णेकर यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, चौपाने आणि पुर्णेकर यांच्या निधनामुळे पक्षाची मोठी हानी झाल्याची शोकाकूल प्रतिक्रिया विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
बाळकृष्ण पुर्णेकर विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीत सक्रिय होते. राजकारणात आल्यानंतर त्यांनी युवक काँग्रेस, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदी ठिकाणी उत्तम काम केले. अत्यंत मनमिळाऊ, विनम्र, हाकेला लगेच ओ देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा चाहता वर्ग होता, असे सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुर्णेकर कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.