भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांचे मीरा भाईंदरवासियांना आवाहन
ठाणे : मीरा भाईंदरला मी येणार म्हटल्यावर विशिष्ट शक्तींकडून मला धमक्या यायला लागल्या. पण मीसुद्धा एकेकाळी या मीरा भाईंदरमध्येच राहिलोय, त्यामुळे कुणाच्या धमक्यांना मी भीक घालत नाही, अशा शब्दांत दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी भाजपच्या विरोधकांना थेट आव्हान दिले. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. येत्या निवडणुकीत 95 पैकी भाजपचे किमान 75 उमेदवार निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी मीरा भाईंदरवासियांना केले.
निवडणुक प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करताना तिवारी म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी इथे येणे झाले होते. त्यावेळच्या मीरा भाईंदरच्या तुलनेत आताचे शहर खुपच वेगळे भासले. इथे आमदार नरेंद्र मेहतांनी केलेल्या विकासकामांमुळे आपल्याला एकदम अंधेरीत फिरत असल्यासारखे वाटले. आ. मेहतांच्या कामाच्या धडाक्यामुळे त्यांची अगदी दिल्लीतही चर्चा असल्याचेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, भाजपने कायमच विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. त्यातच सत्तर वर्षांनंतर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने खंबीर नेतृत्व मिळाले आहे. इतरांनी डॉ. आंबेडकरांच्या नावाचे फक्त राजकारण केले. पण मोदींनी सत्तेवर आल्यानंतर यादेशात डॉ. आंबेडकरांची पाच स्मारके बांधली. एकेकाळी गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडोचा आदेश दिला होता. आता मोदींनी भ्रष्टाचार आणि अस्वच्छतेला भारत छोडोचा आदेश दिला आहे. भ्रष्टाचाराबद्दल कुणालाही माफी नाही, अगदी तो भाजपचा नेता असला तरीही, त्याला योग्य शासन देण्याचे भाजपचे धोरण आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्याविरोधातील या लढाईत पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. निवडणूक असते तेव्हा मोदीजींच्या आईसुध्दारिक्षातून मतदान करायला जातात, असे सांगत ते म्हणाले की, महापालिकेत भाजपची एकाहाती सत्ता आली, तर मी त्या विजयी मिरवणुकीत नाचायला सर्वांत पुढे असेन.
आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवरही चांगलेच तोंडसुख घेतले. या शहरातील विरोधकांची गुंडगिरी संपवणे गरजेचे आहे, असे सांगताना ते म्हणाले की, जर या शहरात मनोज तिवारीच्या गाडीच्या काचा फुटू शकतात, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? पण त्यांना दाखवून द्या, आम्ही घाबरणारे नाही, तर डोळ्यात डोळे घालून बोलणारे लोक आहोत. इथल्या भ्रष्टाचार्यांना रस्त्यावर आणण्यासाठी ही निवडणुक म्हणजे चांगली संधी आहे. तेव्हा ती वाया घालवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.