नवी मुंबई : महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालानुसार सन 2016 -17 या आर्थिक वर्षात नवी मुंबई शहराच्या पर्यावरणात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण गुणवत्ता निर्देशांक (EQI – 73.66) आणि पर्यावरण कामगिरी निर्देशांक (EPI – 672.50) यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे 2.7 आणि 7.9 अंकांनी वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून या वाढीमध्ये हवा व पाणी गुणवत्तेमधील सुधारणा, घनकच-याचे सक्षम वर्गीकरण व पुनर्वापर, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित देखभाल, पाण्याच्या अपव्ययामध्ये झालेली घट, खारपुटीच्या वनक्षेत्राचे संरक्षण, नागरिकांच्या तक्रारीचे प्रभावी निवारण व नागरिकांचा सहभाग अशा विविध घटकांचा सहभाग आहे.
पर्यावरण स्थिती अहवालानुसार सन 2016-17 मध्ये नवी मुंबई शहरातील SO2, NOx व Ozone च्या प्रदूषकांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) ने निश्चित केलेल्या निकषापेक्षा कमी आहे. नवी मुंबईत वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण निकषापेक्षा जास्त असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत धुलीकणांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. ही घट होण्यामागे मुख्यत्वे करुन औदयोगिक क्षेत्रातील रस्ते बांधणीच्या कामाची पूर्तता, 22 उदयोगसमुहांमध्ये पारंपारिक इंधनाऐवजी पाईप नॅचरल गॅसच्या (PNG) इंधन वापरामुळे इंधन ज्वलनात घट होऊन हवा प्रदुषकांच्या प्रमाणात झालेली घट, दगडांपासून खडी निर्माण करण्याच्या जागी धुलीकणांच्या निर्मितीस प्रतिबंध करणा-या उपाययोजना करणे तसेच अनेक दगडखाणी कराराची मुदत संपुष्टात आल्याने बंद झाल्या आहेत अशा विविध बाबींचा समावेश आहे. एकंदरीत सन 2015-16 मध्ये वर्षभरात 85 दिवसांच्या तुलनेत सन 2016-17 मध्ये 30 दिवस इतके प्रदुषण दिन प्रमाण कमी झाल्याचे अहवालाव्दारे निदर्शनास येत असून नवी मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारली असल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये ऐराली येथील सनियंत्रीत हवा गुणवत्ता केंद्रातील मापनानुसार त्या विभागात सर्व प्रदुषके प्रमाणात असल्याचे आढळून आल्याने ऐरोली हा हवा गुणवत्तेच्या दृष्टीने राज्यातील सर्वोत्तम विभाग आहे.
महसूल प्राप्त न होणा-या पाण्यामध्ये मागील वर्षीच्या 19 टक्कयावरुन यावर्षी 18 टक्क्यांपर्यंत म्हणजेच साधारणत: 3 दश लक्ष लिटर प्रतिदिन (1000 द.ल.लि. प्रतिवर्ष) इतकी घट झालेली आहे. अशी घट होण्यामध्ये विशेषत्वाने पाणी पुरवठयाकरीता वापरण्यात आलेले ए.एम.आर.(ॲटोमॅटिक मिटर रिडर्स) मीटर्स, ए.एम.आर. न वापरणा-या ग्राहकांची खंडीत करण्यात आलेली नळ जोडणी तसेच बेकायदेशीररित्या पाणी वापरणा-या ग्राहकांविरोधात राबविण्यात आलेली प्रभावी मोहीम या बाबी कारणीभूत आहेत. 30 मार्च 2017 पर्यंत महानगरपालिकेने 4100 हून अधिक ए.एम.आर. मीटर्सची जोडणी केली तसेच साधारणत: 11056 अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या होत्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शहरात निर्माण होणा-या एकूण कच-याच्या साधारणत: 60% (422 मेट्रिक टन) इतका वर्गीकृत केलेला ओला व सुका कचरा क्षेपणभूमीवर प्राप्त होत आहे. यामध्ये घनकचरा वर्गीकरणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राबविण्यात आलेले विविध जनजागृतीपर कार्यक्रम, यामध्ये नागरिकांचा संपूर्ण सहयोग आणि घनकचरा करुन संकलन व वाहतुक करण्यासाठी नियमित वेळापत्रक यामुळे हे साध्य झाले आहे. निर्माण होतो त्या ठिकाणीच घनकचऱ्याचे ओला व सुका असे 100% वर्गीकरणाचे उद्दिष्ट काही महिन्यातच साध्य करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेची नियोजनबध्द वाटचाल सुरु आहे. आगामी वर्षात बांधकाम साहित्याचा कचरा, ई कचरा याबाबतचेही प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन आहे तसेच कोकनेट शेल व झाडाच्या फांदया यापासून गॅसीफायर तंत्रज्ञानाने ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण – 2017 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला महाराष्ट्र राज्यासह देशाच्या पश्चिम विभागात सर्वप्रथम क्रमांकाच्या व देशात आठव्या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन प्राप्त झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने अभिनव प्रकारचे 20 “स्मार्ट ई टॉयलेट” तसेच महिलांकरीता विविध सुविधांनी युक्त स्मार्ट ‘She’ टॉयलेट उभारले असून त्यासोबतच 141 सार्वजनिक आणि 347 सामुहिक शौचालय उभारली आहेत, त्यातून केंद्र सरकारमार्फत नवी मुंबई महानगरपालिका “हागणदारीमुक्त शहर (ODF City)” जाहीर करण्यात आली आहे.
मागील 16 वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरण स्थिती अहवाल सादर करीत आहे. यावर्षीचा अहवाल TERI (The Energy and Resources Institute) या पर्यावरण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकीत संस्थेने तयार केला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या सन 2009 च्या DPSIR (विकास पुरक घटक, संसाधनांवरील ताण, संसाधनांची स्थिती, परिणाम आणि प्रतिसाद) या मार्गदर्शक तत्वांवर आधारीत आहे. या अहवालातून पर्यावरणावर विविध कारणांनी येणार ताण, त्यामुळे होणारा परिणाम आणि त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली कार्यवाही तपशीलासह मांडण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर हा अहवाल पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.