घराघरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी आहे. सार्वजनिक गणेशोत्सव तसेच गृहनिर्माण सोसायटीतील आवारातही सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. महिला वर्गाने घराची साफसफाई करून गणेशोत्सवाकरिता लाडूही बनविण्यास घेतले आहे. परंतु सर्वत्र उत्साही व मांगल्याचे वातावरण असताना नवी मुंबई महापालिका प्रशासनात मूषक नियत्रंण विभागात काम करणार्या कंत्राटी कामगारांच्या घरात आजही काळोखच पहावयास मिळत आहे. मूषक नियत्रंण कामगारांच्या चेहर्यावर ऐन गणेशोत्सवाच्या स्वागताच्या आरंभीच सुतकी अवकळा पहावयास मिळत आहे. अवघ्या १० ते १२ हजार रूपये वेतनावर काम करणार्या या मूषक नियत्रंक कामगारांना अजून जुन व जुलै महिन्याचे वेतन महापालिका प्रशासनाकडून मिळालेले नाही. आता ऑगस्ट महिनाही संपत आला आहे. महागाईच्या काळात घरभाडे, मुलांचे शिक्षण, घरखर्च, आजारपण भागविताना या मूषक नियत्रंक कामगारांना तुटपुंज्या वेतनामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या मूषक नियत्रंक कामगारांच्या थकीत वेतनाचे रडगाणे कायम आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी मूषक नियत्रंक कामगारांच्या थकीत वेतनाबाबत निवेेदनातून पालिका प्रशासनाला लेखी जाब विचारला होता. कालच नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व कॉंग्रेस पक्षाचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी गणेशोत्सवापूर्वी या मूषक नियत्रंक कामगारांचे थकीत वेतन न मिळाल्यास रस्त्यावर उतरून भीक मागून मूषक नियत्रंक कामगारांच्या वेतनासाठी निधी जमा करण्याचा पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे. या प्रकारामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाची नाचक्की होत असली तरी या प्रकाराला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे, दोषी आहे. गेल्या अनेक वर्षापासून मूषक नियत्रंक कामगारांचे वेतन थकीत असतानाही महापालिकेच्या महासभेमध्ये अथवा स्थायी समितीच्या सभेमध्ये या कामगारांच्या थकीत वेतन समस्येवर आवाज उठविण्याचे तसेच पालिका प्रशासनाला जाब विचारण्याचे सौजन्य कोणाही नगरसेवकाने दाखविलेले नाही. आज या कामगारांना दहा ते अकरा हजार वेतन असले तरी अनेक वर्षे त्यांनी अवघ्या पाच हजार रूपये मासिक वेतनावर महापालिका प्रशासनात काम केलेले आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर सहा वर्षापूर्वी त्यांनी पालिका प्रशासनाला या कामगारांनाही अन्य कंत्राटी कामगारांप्रमाणे वेतन देण्यास भाग पाडले. आमदार संदीप नाईकांच्या प्रयत्नांमुळे या कामगारांचा काही प्रमाणात आर्थिक वनवास संपुष्ठात आला आहे. परिसरात उंदरांचा उद्रेक वाढल्यावर लोकांच्या तक्रारी येवू लागताच नगरसेवक मंडळी मूषक नियत्रंक कामगारांवर अरेरावी करत त्यांच्या कामाचा लेखाजोखा मागतात. पण त्याच मूषक नियत्रंक कामगारांना अनेकदा तीन ते चार महिने वेतन मिळत नसताना याबाबत पालिका प्रशासनाला जाब विचारणे नगरसेवकांचे कर्तव्य नाही काय? ठेकेदार सांगतात की महापालिका प्रशासनाकडून मूषक नियत्रंक कामगारांच्या वेतनाचे पैसेच आलेले नाहीत. पालिका प्रशासनाकडे चौकशी केल्यावर तीन वर्षे या कामाचे टेंडरच निघाले नसल्याची खळबळजनक माहिती प्राप्त होते. टेंडर निघाले नाही, वेतन मिळत नाही, वेतन विलंबाबाबत ठेकेदार, महापालिका प्रशासन हात वर करतात, नगरसेवक उदासिनता दाखवितात. अरे पगार नाही द्यायला तर गोरगरीब मूषक नियत्रंक कामगारांना का राबवून घेता, का म्हणून त्यांचा व त्यांच्या परिवाराचा तुम्ही तळतळाट घेता? सध्या महागाई काय आहे याची सर्वांनाच जाणिव आहे. हलाखीचे जीवन जगणारे व आला दिवस ढकलणारे हे मूषक नियत्रंक कामगार नशिबावर हवाला ठेवत आला दिवस ढकलत आहेत. त्यांच्या कामाचे गांभीर्यही कोणी समजून घेत नाही. मूषक नियत्रंकाना दिवसा उजेडी तसेच रात्री-अपरात्री अशा दोन सत्रामध्ये काम करावे लागत आहे. पालिका प्रशासनाकडून तसेच ठेकेदारांकडून कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्या कामगारांकडे अनेक ग्लोव्हजही नसतात. त्यांना मृत उंदिर पकडण्याचे, औषधे टाकण्याचे काम हातानेच करावे लागते. यामुळे मुषक नियत्रंक कामगार नेहमीच आजारी पडतात. रात्रीच्या वेळी फिरताना विजेरी (टॉर्च) आणि काठीही त्यांना स्वखचार्र्नेच आणावी लागत आहे. रात्रभर उंदराच्या गोळ्या टाकून अथवा मृत उंदिर पकडून वणवण फिरल्यावर या मूषक नियत्रंक कामगारांना कोठे विश्रांतीसाठी जागाही उपलब्ध नसते. गावठाण भागात व कॉलनी परिसरात रात्री-अपरात्री भटक्या व मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा या कुत्र्यांनी मूषक नियत्रंक कामगारांना चावे घेतल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकतर वेतन वेळवर नाही, खर्च भागविण्यासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागतात. महापालिका प्रशासनाने व ठेकेदारांनेही वार्यावर सोडले आहे. दोन,तीन व चार महिने वेतन थकल्यावरही मूषक नियत्रंक कामगारांकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवायची. गेल्या अनेक वर्षापासून पालिका प्रशासन दरबारी या मूषक नियत्रंक कामगारांना कोणी वालीच नसल्याचे पहावयास मिळत आहे. थकीत वेतनामुळे व झालेल्या कर्जबाजारीपणामुळे या मूषक नियत्रंक कामगारांनी व त्यांच्या मुलांनी आणि परिवाराने सामूहिक आत्महत्या केल्यावरच महापालिका प्रशासनाला जाग येणार काय?
– संदीप खांडगेपाटील़
८३६९९२४६४६/८०८२०९७७७५