गणेशोत्सव आता अवघ्या 24 तासावर आला आहे. कोकणवासिय एव्हाना आपल्या घरातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणच्या दिशेने रवानाही झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, गृहनिर्माण सोसायटीतील सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश भक्तांची धावपळ सुरू झाली आहे. घरातील गृहीणींची आठवडाभरापासून घरात लगबग सुरू आहे. घरातील सफाईपासून मोदक व लाडू बनविण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. महागाईच्या मदतीला यंदा जीएसटी धावून आली असली तरी गणेश भक्तांच्या उत्साहावर तसूभरही परिणाम झालेला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाला वीजचोरीचे आणि मंडपामध्ये चालणार्या जुगाराचे गालबोट लागू नये याकरिताच गणेश भक्तांसाठी जनजागृतीचा हा अल्पसा प्रयत्न अग्रलेखाच्या माध्यमातून करत आहोत. चोर्या, घरफोड्या का वाढल्या आहेत, तर सरळपणे पोलिसांची गस्त थांबली आहे अथवा या परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग होत नाही असे उत्तर सर्वसामान्यांकडून देण्यात येत आहे. गणेशोत्सव कालावधीत वीजचोरीचे प्रमाण उच्चांक का गाठते याचा शोध घ्यावयाचा झाल्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे भरारी पथकातील कर्मचारी गणेशोत्सव कालावधीत नक्कीच झोपा काढत असतील असे अनुमान काढावयास हरकत नाही. सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता स्वतंत्र वीज मीटरची जोडणी घेतली जाते. परंतु गृहनिर्माण सोसायटी आवारात साजर्या केल्या जाणार्या सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता स्वतंत्र वीज मीटरची जोडणी का घेतली नाही याचा विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी व अधिकार्यांनी आजतागायत गंभीरपणे विचार केलेला नाही. घरगुती कार्यक्रम असला तरी दोन हॅलोजन लावल्यावर तिसरा हॅलोजन लावण्यास आयोजक नकार देतात. कारण घरातील अन्य वीज उपकरणांवर याचा परिणाम होत असतो. गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात साजरा होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता वीज कोठून घेतली जाते याचा वीज मंडळाच्या भरारी पथकाने शोध घेतला पाहिजे. कारण गृहनिर्माण सोसायटीमध्ये साजर्या होणार्या गणेशोत्सवाकरिता सोसायटी ऑफिसमधून अथवा कोणाच्या घरातून नाही तर थेट सोसायटी आवारात असलेल्या विद्युत डीपीमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केली जात आहे. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची कामगिरी खरोखरीच प्रशंसनीय आहे. शेतकर्यांच्या बांधावर जावून ते शेतकर्यांशी सुंसवाद साधून त्यांच्या वीजविषयक समस्यांचे निवारण करत आहेत. तालुक्यातालुक्यामध्ये जावून जनता दरबार घेत आहेत. शेतकर्यांना आजही वीजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गावागावात आजही वेळीअवेळी वीज जात आहे. शेतकर्यांना रात्री-अपरात्री आजही शेतामध्ये जावून पिकांना पाणी भरावे लागत आहे. शेतकर्यांच्या बायकांनाही रात्री-अपरात्री उठून घरामध्ये पिण्याकरिता व अन्य वापराकरिता पाणी भरावे लागत आहे. भारनियमन आणि वीजेची कमतरता या समस्या केवळ वीजचोरीमुळेच निर्माण होत आहेत. शहरी भागात गणेशोत्सव, नवरात्रौत्सव तसेच अन्य धर्मिय उत्सव, साई भंडारे, सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव, भंडारे यासह अन्य कार्यक्रमांकरिता मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होतच असते. घरातील मुलाचा सोसायटीच्या गच्चीवर वाढदिवस साजरा करताना थेट विद्युत डीपीमधून वीज चोरी केली जाते. गणेशोत्सवामध्ये वीजवापराचे प्रमाण वाढीस लागत असले तरी यातील अधिकांश वीजचोरीमध्येच वीज वापरली जात असते. या वीजचोरीचा भुर्दंड इमानेइतबारे वीज देयक भरणा करणार्या अन्य ग्राहकांच्या माथ्यावर येतो आणि ग्रामीण भागातील शेतकर्यांना भारनियमनाच्या संकटाचा सामना करावा लागतो. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये स्वतंत्र विद्युत मीटर घेतले जात असले तरी जवळच्या असलेल्या विद्युत डीपीमधून वीजचोरी करण्याकडे आयोजकांचा अधिक कल असतो. ग्रामीण भागातील शेतकर्यांचे भारनियमनाचे संकट टाळण्यासाठी तसेच अन्य वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा भुर्दंड वाढीचे संकट टाळण्यासाठी या वीज चोरांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने आता खर्या अर्थाने आक्रमक झाले पाहिजे. ज्या गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात वीज चोरी आढळून येईल, त्या गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकार्यांवर, उत्सव कमिटीच्या पदाधिकार्यांवर तसेच डेकोरेटर्सवर गुन्हे दाखल करून त्यांची तुरूंगात रवानगी केली पाहिजे. डेकोरेटर्सचे सर्व साहीत्य जप्त करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. वीजचोरी करण्यात डेकोरेटर्स मंडळीही आघाडीवर असतात. भरारी पथकाने वीज चोरांच्या विरोधात आक्रमकता दाखविल्यास वीजचोरीच्या कृत्याला मोठ्या प्रमाणावर आळा बसून स्वतंत्र वीज मीटर घेण्यास गृहनिर्माण सोसायटी आवारातील गणेशोत्सव मंडळेही पुढाकार घेतील, आपण शहरी भागात वास्तव्य करत आहोत. घरात लाईट गेल्यास तात्काळ वीज कंपनीच्या कार्यालयात संपर्क करून वीज का केली आणि परत कधी येणार याची खातरजमा करून घेतो. शहरी भागाला नेहमीच भारनियमनाच्या समस्येतून वगळले जात असल्याने त्यांना या समस्येचे गांभीर्य समजत नाही. पण गावाकडे असणारे आपले आई-वडील दिवसा भारनियमनामुळे उकाड्यातच दिवस काढतात आणि रात्र शेतावर तसेच घरामध्ये पाणी भरण्यासाठी जागे असतात. त्यांच्या व्यथा आणि समस्या जाणून घ्या. रात्री शेतामध्ये नाग, वाघ, चोरांचा सामना शेतकर्यांना करावा लागतो. आपण शहरी भागात उत्सव साजरा करताना खुलेआमपणे वीजचोरी करतो आणि त्याचा भुर्दंड वीजेची दरवाढ आणि ग्रामीण भागात भारनियमनवाढीमध्ये होते. विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाच्या कार्यक्षमतेविषयी गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रश्नचिन्ह निर्माण होते. दरवर्षी याच कालावधीत गृहनिर्माण सोसायटीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असतानाही विज विभागाचे कर्मचारी हे केवळ बघ्याची भूमिका घेत असतात. हे कोठेतरी थांबले पाहिजे, या चित्रात कोठेतरी बदल झाला पाहिजे. ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनीच आता कोठेतरी कठोर बनले पाहिजे. गणेशोत्सव कालावधीत कोणकोणत्या विभागात किती वीजचोरी होते याचा आढावा घेवून या वीजचोरीचा भुर्दंड त्या त्या कार्यक्षेत्रातील विज विभागाच्या अधिकार्यांवर व कर्मचार्यांवर लावणे आवश्यक आहे. जितकी वीजचोरी होईल, त्याचे देयक त्या कर्मचारी आणि अधिकार्यांच्या वेतनातून वसूल करावी. वीज चोरीला आळा घालण्यासाठी या कर्मचारी व अधिकार्यांनी तसेच त्या विभागाच्या भरारी पथकाने वीज चोरीवर कडक कारवाई करताना वीजचोरांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केल्यास वीज चोरीला नक्कीच आळा बसेल. उत्सव कालावधीत वीजचोरीचे प्रमाण लक्षणीय असते. वीजचोरी करणारे घटक निर्ढावलेले आहेत. वीजचोरी ही त्यांच्या अंगवळणी पडलेली बाब आहे. हे चित्र कशामुळे आणि कोणामुळे निर्माण झाले आहे याचे उत्तर शोधल्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उदासिनतेकडे जाते. काळ बदलला आहे. मानसिकताही बदलली पाहिजे. लाखोच्या वर्गण्या गोळा होतात. पन्नास हजारापासून ते दीड लाखापर्यत पैसे खर्च करून गणेश विर्सजनाला ढोल ताशे आणले जातात. विसर्जन हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून हजारो नव्हे तर लाखो रूपये तात्काळ खर्च होतात. मग काही हजाराचीच वीजचोरी करण्यात कोणता पुरूषार्थ आहे. या वीजचोरीमुळे आपण वीज दरवाढीला आणि ग्रामीण भागात भारनियमनाला आमंत्रण देत आहोत. या वीजचोरीच्या विरोधात सर्वसामान्यांनीही जागरूकता दाखविणे काळाची गरज आहे. आपण गणपतीची पावती फाडतो ना, मग गणपती उत्सवाला वीज कोठून घेतली आहे, याचाही शोध घ्या. आपल्या आसपास कोठे वीज चोरी होत असेल तर तात्काळ वीज कंपनीच्या कर्मचारी अथवा अधिकार्यांच्या निदर्शनास आणून द्या. उत्सवाकरिता वीजचोरी होवू नये यासाठी वीज वितरण कंपनीनेही स्वस्तात वीज उपलब्ध करून दिलेली आहे. एवढे करूनही वीज चोरी होत असेल तर वीज चोरी करणार्यांचीही सराईत गुन्हेगारांशी तुलना करून कठोरातील कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
– संदीप खांडगेपाटील
8369924646/ 8082097775