धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा कालबध्द कार्यक्रम हाती घ्या.
मुंबई : महानगरपालिका, म्हाडा अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमतामुळे आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे मुंबई आणि परिसरात इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. यामध्ये किड्या-मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण सरकारला लोकांच्या जीविताबाबत संवेदना राहिली नाही त्यामुळे धोकादायक इमारतीबाबत सहकार काहीच ठोस निर्णय घेत नाही. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
भायखळा भेंडीबाजार येथील हुसैनीवाला ही पाच मजली इमारत आज सकाळी कोसळली या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला मुंबई महापालिका आणि म्हाडा जबाबदार आहे. महापालिका व म्हाडा अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमुळे वारंवार अशा दुर्घटना घडत आहेत. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस म्हाडा ने दिली होती तरी इमारत खाली का केली नाही ? एक महिन्यापूर्वी घाटकोपर येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईत झालेल्या पावसात गेल्या तीन दिवसांत 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. आणि आजच्या दुर्घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वारंवार घडणा-या घटना़ंमधून सरकार काहीच बोध घेत नाही. या सर्व घटनांसाठी जबाबदार असणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करावी असे खा. चव्हाण म्हणाले.
सरकार आणि महापालिकेचे डिजास्टर मॅनेजमेंट कुठे आहे? फक्त कागदावरच प्रत्यक्षात काहीच नाही. बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्गापेक्षा लोकांचा जीव वाचविणे महत्त्वाचा आहे. सरकारने त्याकडे लक्ष द्यावे. शासनाने तात्काळ धोकादायक इमारती खाली कराव्यात आणि या इमारतींच्या पुनर्बांधणीचा कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तात्काळ मदत द्यावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.