मुंबई : मुंबई शहराच्या भेंडी बाजार परिसरात इमारत कोसळून सुमारे 21 जणांना प्राण गमवावे लागण्याच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई महानगर पालिका जबाबदार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
भेंडी बाजार भागातील इमारत कोसळून बळी गेलेल्या निरपराध नागरिकांप्रती विखे पाटील यांनी संवेदना व्यक्त केल्या. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, ही घटना जेवढी दुर्दैवी आहे, तेवढीच संतापजनक देखील आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखीत झाले आहे. शिवसेनेने या घटनेची जबाबदारी म्हाडावर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अशा अनेक घटनांसाठी महानगर पालिका देखील कारणीभूत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेच्या वृत्ताची शाई अजून वाळलेली नाही. मुंबई मनपातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरूद्ध राज्य सरकार कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे मुंबई शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.