मुंबई – सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीने सरकारी शिष्यवृत्ती नाकारली आहे. पंतप्रधान मोदी देशवासियांना अनुदान सोडण्याचे आवाहन करत असताना त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांकडून त्याविरुद्ध कृती केली जात असल्याने वाद निर्माण झाला होता. अखेर बडोले यांची कन्या श्रुती हिने सरकारी शिष्यवृत्ती सोडणार असल्याचे म्हटले आहे. एका पत्रातून श्रुती बडोलेने याबद्दलची माहिती दिली.
‘माझ्यात गुणवत्ता आहे. मात्र माझे वडिल मंत्री आहेत. त्यामध्ये माझा काय दोष?,’ असा सवाल श्रुती बडोलेने पत्रातून उपस्थित केला आहे. ‘मी युकेमधील ससेक्स विद्यापीठातून एम. एस्सीचे शिक्षण पूर्ण केले. त्या ठिकाणी माझा प्रवेश आणि शिक्षण गुणवत्तेनुसार झाले. विद्यापीठाने मला गुणवत्तेच्या जोरावरच शिष्यवृत्ती दिली. त्यानंतरचे माझे शिक्षणही गुणवत्तेनुसारच झाले. त्यावेळी माझे वडिल मंत्रीदेखील नव्हते,’ असे श्रुती बडोलेने पत्रात म्हटले आहे.
‘याआधी परदेशातील विद्यापीठांनी मला गुणवत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती दिली आहे. मात्र पीएचडीसाठी शिष्यवृत्ती मिळण्याची सवलत विद्यापीठात नाही. त्यामुळेच राज्य सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. जगातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असल्यास विद्यार्थ्याला आर्थिक निकषांची अट नसते. मात्र तरीही वडिल मंत्री असल्याने वाद होतील, याची कल्पना होती,’ असे म्हणत श्रुतीने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
‘पीएचडी इन सायन्ससाठी राज्य सरकारकडे शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी तीन जागा आहेत. या तीन जागांसाठी केवळ दोन अर्ज आले असून एक जागा अजूनही रिक्त आहे. त्यामुळे मी एखाद्या होतकरु विद्यार्थ्याला डावलून शिष्यवृत्ती मिळवली असे कसे म्हणता येईल? जगातील पहिल्या १०० विद्यापीठात प्रवेश घेताना आर्थिक निकष लागू होत नाही, हा नियम माझ्या शिक्षणाच्या आधीपासून अस्तित्त्वात आहे. मग यात माझा दोष काय? आता वडिलांच्या मंत्रीपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का?’ असे प्रश्न पुजाने उपस्थित केले आहेत. वडिलांच्या मंत्रीपदामुळे गुणवत्ता झाकोळली जाणार असल्यास शिष्यवृत्ती नाकारत असल्याचे श्रुतीने पत्रात म्हटले आहे.