मुंबई | १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी जन्मठेप झालेल्या अबू सालेमने विशेष टाडा न्यायालयात अर्ज केला आहे. दिल्लीतील सुनावणीसाठी हजर राहता यावे यासाठी मला मुंबईऐवजी दिल्लीतील तुरुंगात ठेवावे अशी विनंती अबू सालेमच्यावतीने न्यायालयात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात माझ्या जिवाला धोका असल्याचा दावा सालेमच्या वकिलांनी केल्याचे समजते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज अब्दुल रशिद खान, करिमुल्ला खान ऊर्फ हुसेन हबीब शेख, ताहिर मोहम्मद मर्चंट ऊर्फ ताहिर टकल्या, रियाझ सिद्दिकी या सहा जणांना दोषी ठरवले होते. यातील मुस्तफा डोसाचा न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काही दिवसांनी मृत्यू झाला होता. गुरुवारी न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली. न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निकालानंतर अबू सालेमच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला. यात दिल्लीतील सुनावणीत हजर राहता यावे यासाठी मला मुंबईऐवजी दिल्लीतील तुरुंगात ठेवावे अशी विनंती अबू सालेमने केली आहे. अबू सालेमचे प्रत्यार्पण करताना त्याला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, अशी अट पोर्तुगाल सरकारने घातली होती. त्यामुळे न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रत्यार्पण कायद्यानुसार सालेमला २५ वर्षांहून जास्त काळ तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकत नाही. सालेम गेली १२ वर्ष तुरुंगात असून आता त्याला आणखी १३ वर्ष तुरुंगात राहावे लागणार आहे. आता हा तिढा कसा सोडवला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.