स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९९२४६४६ / ८०८२०९७७७५
मुंबई : राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतंर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व अभियंत्यांनी तातडीने खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
खड्डेमुक्त रस्ते करण्यासंदर्भात आज श्री. पाटील यांनी राज्यातील सर्व मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकामे) अ. अ. सगणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील यांनी हे खड्डे बुजविण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करून 25 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या. खड्डे भरण्यासाठीच्या निविदांना जर योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतः हे खड्डे बुजविणार आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य/सामुग्री खरेदी करण्यात येईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील सर्व खड्डे भरुन ते दुरुस्त करण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, जुन्या निविदांसंदर्भात व्हॅट व जीएसटीमधील फरकासंदर्भातील प्रश्न निकाली काढण्यात आला असून, कंत्राटदारांना या फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी जेट पॅचर तंत्रज्ञानाचा वापर करावा. यासंबंधी येणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात आले असून, त्यासंबंधी विभागाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
जे मुख्य अभियंते, अधिक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंते आपल्या कार्यक्षेत्रातील खड्डे 15 नोव्हेंबरपूर्वी दुरुस्त करतील त्या अधिकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.