राजकारणातील नैतिकता संपुष्ठात आली आहे. समोरच्या प्रतिस्पर्ध्याला संपुष्ठात आणण्यासाठी आता कोणत्याही प्रकाराचा आधार घेतला जात आहे. आरोप-प्रत्यारोपामुळे जनसामान्यांवर फारसा परिणाम होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर आता ‘फोटो शॉप’चा आधार घेत थेट चारित्र्यहनन करण्याचा विकृत प्रकार वाढीस लागला आहे. एकाद्या चांगल्या राजकारण्यांची जनसामान्यांतील प्रतिमा मलीन करण्यासाठी एवढेच नाही तर त्या राजकारण्याला सामाजिक, राजकीय जीवनातून पूर्णपणे उध्दवस्त करण्यासाठी फोटो शॉपचा आधार घेत एडीटींग प्रकाराचा आधार घेत आपल्या प्रतिस्पर्धी राजकारण्याचे चारित्र्यहनन करण्याचा हिडीस प्रकार नव्याने सुरू झाला आहे. कोणत्याही नाण्याला या दोन बाजू असतात. सोशल मिडीया हे माहिती पसरविण्यासाठी उपयुक्त माध्यम आहे. वार्याच्या वेगापेक्षा कोसो मैल अधिक गतीने सोशल मिडीयावर माहिती वितरीत होत आहे. फेसबुक, व्हॉट्स अप आणि ट्विटर या माध्यमातून सोशल मिडीया प्रभावी माध्यम ठरू लागले आहे. या सोशल मिडीयाला हाताशी ठरत आपल्या विरोधातील राजकारण्यांना संपविण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढीस लागले आहे. त्यातच आपल्या विरोधी राजकारण्यांचे फोटो ‘मिक्सींग’ करून त्यात एकाद्या अपरिचित महिलेचा फोटो घुसडून आपले विकृत समाधान करून घ्यायचे. ते फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वत्र पसरवयाचे. सोशल मिडीयामध्ये कार्यरत असणार्यांमध्ये दुर्दैवाने डोळस लोकांची संख्या कमी आणि आंधळ्या लोकांचीच संख्या अधिक असल्याचे अनुभवाअंती पहावयास मिळाले आहे. सोशल मिडीयावर काही आले का, त्याची खातरजमा न करता ते अवघ्या काही सेंकदात दुसर्या ग्रुपवर पाठविण्याची जणू काही स्पर्धाच लागलेेली असते. आपल्या विरोधातील राजकारण्याला संपविण्यासाठी फोटो एडिटिंग करून फोटो मिक्सिंग करून आपण समोरच्याचे राजकारण संपवित नाही तर त्याचे पूर्ण कुटूंब संपवित आहात याचे भानही संबंधितांना राहत नाही. अशा विकृत राजकारण्यांना भर चौकात सर्व समाजासमोर विवस्त्र करून मरेस्तोवर चाबकाने फोडून काढणे हाच यावर सर्वोत्तम उपाय आजच्या काळात ठरणार आहे. विकृत मानसिकता बनलेले राजकारणी आपल्या विरोधकांचे राजकारण संपविण्यासाठी आपल्यातील विकृतीला खतपाणी घालून मिक्सिंग फोटो सोशल मिडीयावर फोटो टाकतात व सोशल मिडीयावरील अंध मंडळी कोणत्याही प्रकाराची खातरजमा न करता ते फोटो पुढच्या ग्रुपवर टाकून मोकळे होतात. सत्याचाच विजय होतो हे बोधवाक्य आता इतिहासजमा झाले आहे. सत्य आपली बाजू मांडेपर्यत असत्य सारा गाव फिरून आलेले असते आणि सत्याला खाली मान घालून वावरावे लागते ही आजच्या कलियुगातील परिस्थिती आहे. हे फोटो एडिटींग करून फोटो मिक्सिंग करणार्या नराधमांचा पोलिसांनी शोध घेतलाच पाहिजे. अशा अपप्रवृत्तींना वेळीचा आळा घातला नाही तर नजीकच्या भविष्यात सर्वच राजकारण्यांची प्रतिमा याच स्वरूपात मलिन होण्याचा धोका आहे. काल-परवा नवी मुंबईतील राजकारण्यांच्या बाबतीत सुरू झालेल्या प्रकाराविषयी तळाशी जावून राज्याच्या गृहखात्याने शोध घेतलाच पाहिजे. अशा अपप्रवृत्तींना उजेडात आणले पाहिजे. कारण हे करणारे कोण आहे, त्यांचे धाडस का वाढीला लागले आहे, या प्रकारामागील बोलविता धनी कोण आहे, याचा उलगडा हा झालाच पाहिजे. राजकारणात आणि जनसामान्यांत नावारूपाला येण्यासाठी वर्षे नाही तर दशके खर्ची घालावी लागतात. जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी उभी हयात खर्ची घालावी लागते. असल्या घृणास्पद प्रकारामुळे उभी हयात खर्च करून केलेली जनसामान्यांतील चांगली प्रतिमा अवघ्या काही सेंकदामध्ये मलीन होत असते. त्यामुळे या प्रकाराचा उलगडा राज्याच्या गृहविभागाने लवकरात लवकर केला पाहिजे. देशामध्ये लोकशाही आहे. जनसामान्यांमध्ये काम करून विरोधकांपेक्षा आपला जनाधार वाढविण्याचा मार्ग सोडून हा फोटो मिक्सींगचा किळसवाणा शॉर्ट कट लोकशाहीला घातक आहे. यामुळे संबंधित राजकारण्यांच्या कुटूंबाला, मित्र परिवाराला, समर्थकांना किती मानसिक हादरा बसला आहे. अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेकांच्या घरामध्ये सुतकी वातावरण निर्माण झाले आहे. उद्या पोलिसांनी याचा शोध न घेतल्यास राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण वाढीस लागण्याचा अधिक धोका आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच महाराष्ट्राचे गृहखात्याचाही कारभार आहे. गेल्या दोन दिवसापासून नवी मुंबई कार्यक्षेत्रात याच स्वरूपातील एक किळसवाणा प्रकार सुरू झालेला आहे. त्यामुळे नवी मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्याच राजकारणात खळबळ उडालेली आहे. स्वच्छ प्रतिमा आणि प्रगल्भ विचारसरणी असणार्या सुसंस्कृत स्वभावाचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसही असला प्रकार खपवून घेणार नाही याची आम्हाला खात्री आहे. त्यांनी राज्याच्या गृहखात्याला तातडीने याविषयी चौकशीचे आदेश देणे आवश्यक आहे.
– संदीप खांडगेपाटील
८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५