स्वंयम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५
नवी मुंबई : घर फिरले की घराचे वासेही फिरतात याचा अनुभव सध्या बेलापुर रेल्वे स्टेशननजीक असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयाला अनुभवयास येत असणार. पामबीच मार्गावरील बेलापुर किल्ले गावठाण चौकात नवी मुंबई महापालिकेचे नवीन मुख्यालय कार्यरत झाल्यामुळे एकेकाळी पालिका मुख्यालय म्हणून वर्दळ असलेल्या मुख्यालयात आता वर्दळ कमी झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे परिवहन उपक्रमाचा आणि परिमंडळ एकचा कारभार किमान जुन्या मुख्यालयातून आज चालविला जात असल्यामुळे थोडीफार वर्दळ कायम आहे. या जुन्या मुख्यालयात पालिकेच्या लिफ्ट सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून संबंधित विभागाला सांगूनही लिफ्ट दुरूस्तीबाबत चालढकल केली जात आहे. सोमवारी (दि. ११ सप्टेंबर) रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास दोन माजी नगरसेवक, एक विद्यमान नगरसेवक आणि एका वेबमिडीयाच्या संपादकालाही या नादुरूस्त लिफ्टच्या गोंधळाचा सामना करावा लागला.
पालिका मुख्यालय स्थंलातरीत झाल्यापासून जुन्या मुख्यालयातील लिफ्टच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. ही लिफ्ट सेवा चालू असण्याऐवजी सतत बंदच पडलेली असल्याची तक्रार महापालिका कमर्र्चार्यांकडून करण्यात येत आहे. बंद पडलेल्या लिफ्टमुळे महापालिकेच्या जुन्या मुख्यालयात येणार्या मनपा कर्मचारी, अधिकारी, कंत्राटदार, नगरसेवक व इतर संबंधितांना कोकण रेल्वेच्या लिफ्टचा आधार घ्यावा लागत आहे. सहाव्या मजल्यापर्यत कोकण रेल्वेच्या लिफ्टचा वापर करून आठव्या मजल्यावर जाण्याकरिता उर्वरित दोन मजले मनपा कर्मचारी, अधिकारी, कंत्राटदार, नगरसेवक व इतर संबंधितांना पायी चालून जावे लागत आहे.
सोमवारी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक निवृत्ती जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका सौ. निलम निवृत्ती जगताप, शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे आणि नवी मुंबई लाईव्ह.कॉम या वेबमिडीयाचे संपादक सुजित शिंदे महापालिकेच्या लिफ्टमध्ये आले. लिफ्ट चालु करूनही बराच वेळ लिफ्टचा दरवाजा बंद होवून लिफ्ट तळमजल्यावरच राहीली, त्यानंतर लिफ्ट एक एक मजल्यावर बराच वेळ थांबत होते. या प्रकाराने लिफ्टमध्ये असलेल्या अन्य एका महिलेने भयभीत होत दुसर्या मजल्यावरूनच लिफ्टमधून पळ काढला. लिफ्टमध्ये बराच वेळ सावळागोंधळ सुरूच होता. अखेरिला शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी लिफ्टचे बटन दाबून धरले आणि लिफ्टने आतील प्रवाशांना आठव्या मजल्यापर्यत आणून सोडले.
परिवहनच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना या प्रकाराची नगरसेवकांनी कल्पना देताच त्यांनी गेल्या काही महिन्यापासून या लिफ्टच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नसल्याची नाराजी व्यक्त केली. महापालिकेचे चौथे सभागृह या जुन्या मुख्यालयात कार्यरत असताना एकदा हीच लिफ्ट थेट सातव्या मजल्यावरून तळमजल्यावर येवून आदळली होती. सुदैवाने लिफ्टमध्ये त्यावेळी कोणी नसल्याने दुर्घटना घडली नाही. परंतु लिफ्ट दुरूस्तीकडे कानाडोळा कायम राहील्यास मोठी दुर्घटना कोणत्याही क्षणी होण्याचा संताप माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी यावेळी व्यक्त केला.