आमदार मंदा म्हात्रेंनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीची राज्य सरकारकडून दखल
नवी मुंबई : नवी मुंबई विकसित शहर असून नवी मुंबई शहरातील बहुतांशी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. सायन पनवेल महामार्गावर तर खड्ड्यांचे साम्राज्य पडले असून या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सदर गंभीर प्रश्नाबाबत ‘बेलापूर’च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविला होता. याच अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. प्रवीण पोटे-पाटील यांनी १० सप्टेंबर रोजी तुर्भे येथील सायन पनवेल महामार्गावरील खड्डेमय आणि खराब रस्त्यांचा पाहणी दौरा केला. यावेळी स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या
त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे अनेक अपघात होत आहेत. ना. प्रविण पोटे-पाटील यांनी संबंधित अधिकार्यांना एका महिन्यात सायन-पनवेल महामार्गावरील संपूर्ण खड्डे बुजविणे, डांबरीकरण आणि कॉंक्रीटीकरणाचे आदेश दिले असून लवकरच खड्डेमुक्त नवी मुंबई पहायला मिळेल. अनेक वर्षापासून प्रलंबित कामे या तीन वर्षात झाली असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पीडब्लूडी सचिव सी. पी. जोशी, मुख्य अभियंता श्रीमाल, वरिष्ठ अभियंता आर. टी. पाटील, उपअभियंता मंजुषा दळवी तसेच ‘भाजपा’चे नवी मुंबई जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, विक्रम पराजुली, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, रमेश शिंदे, सुरेश गायकवाड तसेच नागरिक उपस्थित होते.
नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर रोड वरील तुर्भे येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना अडचणी येत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच येथे शिंदे नामक व्यक्तीचा येथे अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असून घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर संकट ओढवले आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेली मागणी तसेच येथील रस्त्यांबाबत येणार्या असंख्य तक्रारींच्या अनुषंगाने सदर पाहणी दौरा करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. प्रवीण पोटे-पाटील यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात १२२० कोटींचा कामे पूर्ण झाली असून शहरी भाग असल्याने खड्ड्यांमुळे कोणालाही त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील कंत्राटदाराने केलेल्या चुकीच्या कामामुळे दोषींवर कारवाई करण्यात येणार असून येत्या १ महिन्यात सायन-पनवेल हायवेवरील रस्ता खड्डेमुक्त पहायला मिळतील. अपघाताला आळा घालण्यासाठी १०० टक्के रस्ते कॉंक्रीटमय करणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न आपण साकारणार असल्याचेही ना. पोटे-पाटील यांनी सांगितले. तर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोन महिन्यांपूर्वी एका महिला बाईकस्वाराचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पावसाळी अधिवेशन सुरु असतांना सदर प्रकाराबाबत आवाज उठवून सायन-पनवेल महामार्गाचे कॉंक्रीटीकरण आणि खड्डेमुक्त रस्ते करण्याची मागणी आपण लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत केली होती. याच अनुषंगाने राज्यमंत्र्यांनी पाहणी दौरा केल्याचे आमदार सौ. म्हात्रे यांनी सांगितले.