स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८८२०९७७७५
नवी मुंबई : वीज वाचविण्यासाठी एकीकडे राज्य सरकारकडून व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. स्वत: राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे गावागावात बांधाबांधावर जावून शेतकर्यांच्या वीजविषयक समस्या सोडवित आहे. श्रीमंत नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ सेक्टर चार येथील महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयात वीजेची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरू आहे. कर्मचारी-अधिकारी नसतानाही विभाग कार्यालयात पंखे व ट्युब लाईट सुरूच असलेल्या पहावयास मिळतात.
तीन महिन्यापूर्वीच महानगरपालिकेचे नेरूळ विभाग कार्यालय नेरूळ पूर्वेकडून नेरूळ पश्चिमेला स्थंलातरीत करण्यात आले आहे. नेरूळ नोडमध्ये पालिकेचे अनेक भुखंड असतानाही पालिकेच्याच नेरूळ सेक्टर चार येथील शाळेमध्ये विभाग अधिकारी कार्यालयाचा कारभार चालविला जात आहे. आधीच शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग कमी पडत असतानाही महापालिका आयुक्तांच्या अट्टहासापायी पालिका शाळेत विभाग अधिकारी कार्यालय स्थंलातरीत करण्यात आले असल्याचे पालिका कर्मचारी व अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. नेरूळ पूर्वेला पालिकेचे पाच मजली सुसज्ज स्थितीतील नवीन समाजमंदिर असतानाही शाळेमध्ये विभाग अधिकारी कार्यालय हलविण्यात आल्याने नेरूळवासियांमधून नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. या प्रभागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन वेळा विजयी झालेल्या हॅट्ट्रीकवीर माजी नगरसेविका सौ. स्नेहा विकास पालकर यांनीही पालिका शाळेत विभाग अधिकारी कार्यालय हलविण्यात आल्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नेरूळ पूर्वेकडे असलेल्या पाच मजली समाजमंदिरामध्ये विभाग अधिकारी कार्यालय स्थंलातरीत करण्यात यावे आणि पालिका शाळेतील मुलांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये यासाठी त्यांनी प्रशासन दरबारी पाठपुरावाही सुरू केला आहे. माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांच्याही कानावर पालकर यांनी ही समस्या मांडली असून लवकरात लवकर विभाग अधिकारी कार्यालय स्थंलातरीत करण्याची मागणी केली आहे.
या विभाग अधिकारी कार्यालयात कामे घेवून जाणार्या नागरिकांकडून त्या ठिकाणी वीजेची उधळपट्टी होत असल्याच्या प्रकाराविषयी सातत्याने नाराजीचा सूर आळविला जात असून वीज बिल यांना त्यांच्या खिशातून भरावे लागत नसल्याने ही उधळपट्टी होत असल्याचा संतापही नेरूळवासियांकडून गेल्या काही दिवसांपासून उघडपणे व्यक्त केला जात आहे. मंगळवारी (दि. १२) सप्टेंबर रोजी आमच्या प्रतिनिधीने नेरूळ विभाग कार्यालयात फेरफटका मारला असता वीजेची उधळपट्टी निदर्शनास आली. पालिका शाळेच्या दुसर्या मजल्यावर विभाग अधिकारी कार्यालयात प्रशासन विभागात अवघी एकच महिला कर्मचारी काम करत असताना त्या कार्यालयात सहा पंखे व सर्व ट्युब लाईट सुरू असल्याचे पहावयास मिळाले. याच कार्यालयाच्या समोर असणार्या कार्यालयात कोणताही कर्मचारी तसेच अधिकारी नसतानाही पंखे व ट्युब लाईट सुरूच होत्या. मल:निस्सारण विभागात एकच कर्मचारी असताना सर्व पंखे व ट्युब लाईट सुरू होत्या. त्यालगतच्या स्थापत्य विभागातही एकच कर्मचारी असताना चार पंखे व सर्व ट्युब लाईट्स सुरू होत्या. तळमजल्यावर मात्र नागरी सुविधा केंद्रामध्ये तीन खिडक्यातून कारभार सुरू असताना या कार्यालयात केवळ एकच पंखा असल्याचे निदर्शनास आले. या कार्यालयाचा कोंडवाडा झाला असून कर्मचार्यांना उकाड्यामध्ये काम करावे लागत आहे. नेरूळ विभाग कार्यालयात पालिका कर्मचारी व अधिकार्यांकडून होत असलेली वीजेची उधळपट्टी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.