स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८८२०९७७७५
नवी मुंबई : सारसोळे गावातील एका महिलेला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न होवून चार दिवसाचा कालावधी उलटला आहे. स्थानिक भागातील ग्रामस्थांनी, सामाजिका कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचारी व अधिकार्यांना तसेच नेरूळ गाव येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये याची कल्पना देवूनही या ठिकाणी आरोग्य विभागाचे कोणीही न फिरकल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावर साई अपार्टमेंट आहे. या इमारतीमध्ये राहणार्या नीतू सिंग या ३२ वर्षीय महिलेला डेंग्यू झाल्याने डी.वाय.पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. महिलेला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न होताच स्थानिक परिसरातील सामाजिका कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी नेरूळ नागरी आरोग्य केंद्राला तसेच पालिका प्रशासनातील अन्य कर्मचारी व अधिकार्यांना या डेंग्यू आजाराची कल्पना दिली. डेंग्यू झालेला रूग्ण उपचार घेवून घरी आला तरी पालिका आरोग्य विभागाचे कोणीही या इमारतीमध्ये धुरीकरणासाठी अथवा पावडर फवारणीसाठी फिरकलेले नाही. विशेष म्हणजे या इमारतीत प्रभाग ८६मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किंगमेकर मनोज यशवंत मेहेर यांची सदनिका असतानाही आरोग्य विभाग कानाडोळा करत असल्याने स्थानिक रहीवाशांमध्ये उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. माणसे डेंग्यूने मेल्यावरच आरोग्य विभाग दखल घेणार काय असा संतप्त सवाल स्थानिक रहीवाशांकडून विचारण्यात येवू लागला आहे.