स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५
नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील नेरूळ पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाची दुरावस्था पाहता या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची लेखी मागणी प्रभाग ८७ मधील शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. ऑक्टोबर २०१६ पासून नगरसेविका सुनिता रतन मांडवे सातत्याने या समस्येबाबत पालिका आयुक्तांकडे लेखी पाठपुरावा करत आहेत.
नगरसेविका सुनिता रतन मांडवेंच्या प्रभागात असणार्या हार्बर रेल्वे रूळावरील नेरूळ पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पादचारी पुलाच्या दुरावस्थेकडे त्या दीड वर्षापासून पालिका प्रशासनाचे लेखी निवेदनातून तसेच संबंधित अधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. या पादचारी पुलाच्या निर्मितीला अडीच दशकाहून अधिक कालावधी लोटलेला आहे. नेरूळ पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा हा महत्वपूर्ण पादचारी पुल असल्याने विद्यार्थी, युवक, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक असे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाहून ये-जा करत असतात. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यत या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या पुलाची अवस्था धोकादायक झालेली असल्याने या पुलाचे महापालिका प्रशासनाकडून शक्य तितक्या लवकर स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे. सातत्याने लेखी निवेेदनातून तसेच संबंधित अधिकार्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून पालिका प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी गेल्या ८ महिन्यामध्येसातत्याने केला आहे.
या समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावरही या पादचारी पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटविषयी प्रशासनाकडून आजतागायत चालढकलच करण्यात आलेली आहे. संबंधित पालिका अधिकारी या समस्येविषयी समाधानकारक उत्तरे न देता केवळ उडवाउडवीचीच उत्तरे देत आहेत. या पुलाबाबत नजीकच्या काळात काही दुर्घटना झाल्यास त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही यावेळी निवेदनातून नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिला आहे.