स्वंयम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५
नवी मुंबई : सारसोळे गाव आणि साथीचे आजार हे वर्षानुवर्षे कायम असलेले चित्र आजही बदलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या मार्गावरील होळी मैदानानजीकच्या नितु सिंग या ३२ वर्षीय महिलेला डेंग्यू झाल्याचे प्रकरण ताजेच असताना होळी मैदानानजीकच्याच अन्य एका इमारतीमध्ये एका दीड वर्षीय बालकाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यास उपचारासाठी सोमवारी (दि. ११ सप्टेंबर) नेरूळ रेल्वे स्टेशननजीकच्या तेरणा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गणेशोत्सव कालावधीत होळी मैदानानजीकच्या एका इमारतीमधील रहीवाशाला डेंग्यू झाल्यानेे उपचारासाठी रूग्णालयात घेवून जावे लागले होते. सारसोळे गावातील होळी मैदानानजीक सतत डेंग्यूचे रूग्ण आढळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये व अन्य रहिवाशांमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे. सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील होळी मैदानानजीकच्या साइर्र अपार्टमेंटमधील नितु सिंग या ३२ वर्षीय महिलेला डेंग्यू झाल्याने डी.वाय. पाटील रूग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. याच होळी मैदानानजीकच्या नारायण सदन या इमारतीमधील रियाज भाई यांच्या फिफान खान या दीड वर्षीय मुलाला डेंग्यू झाल्याने उपचारासाठी सोमवारी (दि. ११ सप्टेंबर) नेरूळ रेल्वे स्टेशननजीकच्या तेरणा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये बालाराम निवास या इमारतीमधील एका नागरिकाला डेंग्यू झाल्याने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले होते.