मुंबई : ‘सावली फाऊंडेशन’च्या वतीने देण्यात येणारा ‘नवशक्ती-नवचेतना’ पुरस्कार दै. ‘प्रहार’च्या फिचर एडीटर योगिनी बाबर यांना जाहीर झाला आहे. बुधवार, दि. २७ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता भांडूप येथे होणाºया कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका आणि ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ (माई) यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सावली फाऊंडेशन’च्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवात विविध क्षेत्रातील कर्तबगार, आदर्श आणि इतरांसाठी प्रेरक ठरतील अशा महिलांना ‘नवशक्ती नवचेतना पुरस्कार २०१७’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती गारेकर, उद्योजिका गीता कॅस्टलिनो, जगावेगळी ‘आई’ गौरी सावंत, अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय महिला कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, मुस्लिम समाजात पत्रकारितेमध्ये पीएचडी मिळविणारी पहिली तरुणी लुब्ना मुसा यांचेही ‘नवशक्ती नवचेतना’ पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. दै. प्रहारच्या फिचर एडिटर योगिनी बाबर यांनी आपल्या पत्रकारीतेच्या १७ वर्षात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मुंबईतही सकारात्मक पत्रकारीतेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, महिलांविषयक तसेच युवाविश्वातील घडामोडींवर आधारीत लेखन केले. कौटुंबिक मार्गदर्शन सल्ला केंद्र, भारती विद्यापीठाच्या कराड विधी कॉलेजमधील विजया महिला सबलीकरण केंद्राच्या त्या सदस्या आहेत. यात्रेतील तंबू मालकांचा प्रश्न, घरेलू कामगार महिलांचे काम, बेटी बचाव अभियान आदी बाबींवर त्यांनी केलेल्या लेखनास यापूर्वी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.