सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणार्या परिचारिका, सहाय्यक आरोग्य सेविका यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचार्यांवर होत असलेल्या अन्यायाविषयी इंटकने महापालिका आयुक्तांना लेखी निवेदनातून कल्पना दिली असून लवकरात लवकर संबंधितांना न्याय न मिळाल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोरच आंदोलन छेडण्याचा इशारा इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिला आहे.
महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागात काम करणार्या परिचारिका, सहाय्यक आरोग्य सेविका आणि अन्य कर्मचार्यांनी मंगळवार, दि. २६ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने इंटकचे आणि महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व स्विकारले. त्यावेळी महाराष्ट्र क र्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाडही उपस्थित होते. यावेळी परिचारिका, सहाय्यक आरोग्य सेविका आणि अन्य कर्मचार्यांनी काम करताना प्रशासनाकडून होत असलेला अन्याय, अधिकार्यांची संभाषणातील अरेरावी आणि अपमानास्पद भाषा तसेच अन्य समस्यांचा पाढा वाचून दाखविला.
नवी मुंबईसारख्या प्रगत शहराचे प्रतिनिधीत्व करणार्या महापालिकेत महिला कर्मचार्यांना मिळत असलेली वागणूक आणि त्यांच्यावर होत असलेला अन्याय ही संतापजनक बाब असून ही घटना या निवेदनातून रवींद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
आरोग्य विभागातील सहाय्यकांची कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० आहे. मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कालावधीत ही वेळ एक तासाने वाढविण्यात आली. तथापि आता या महिलांना रात्री उशिरा आठ ते वेळ पडल्यास रात्री दजा वाजेपर्यत थांबून काम करावे लागते. या महिलांना घरी पोहोचण्यास मध्यरात्री १२ ते १२.३० वाजत आहेत. सध्याचे महिलांविषयी असुरक्षिततेचे वातावरण पाहता यादरम्यान या महिला कर्मचार्यांबाबत प्रवासादरम्यान रेल्वेत, बसमध्ये, रस्त्यावर काही अनुचित घटना घडल्यास त्यांची जबाबदारी कोण घेणार, झालेले आर्थिक नुकसान भरून काढता येईल, परंतु अन्य विपरीत घटना घडल्यास त्यांची जबाबदारी कोण घेणार? रात्री उशिरा काम करताना या महिला कर्मचार्यांनाच नागरी आरोग्य केंद्राला टाळे लावून जावे लागत आहे. यावेळी आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक तसेच अन्य कोणतेही कर्मचारी नसतात. कोणा मद्यपीने अथवा वासनांध माणसाने याचा फायदा कोणते दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न करण्यास या महिला कर्मचार्यांची सुरक्षितता कोण घेणार? याचा प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आयुक्तांकडे केली आहे.
सहाय्यक आरोग्य सेविकांवर कामाचा ताण वाढत असून या कर्मचार्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. या सहाय्यक आरोग्य सेविकांना काम सोडून अन्य प्रशासकीय कामाचा ताण वाढत आहे. रात्री उशिरापर्यत काम करावेच लागते, पण घरी जावूनही काम संपवून आणण्याचे आदेश वरिष्ठांकडून दिले जात आहे. सकाळी ८.३० पासून रात्री उशिरापर्यत काम करायचे आणि घरी जावून पुन्हा प्रशासकीय काम करायचे, हे कोणत्या निकषात बसत आहे आणि राज्यातील अन्य कोणत्या महापालिका प्रशासनात अशा प्रकारचे काम चालत आहे, याची आपण लेखी कल्पना द्यावी, असे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
परिचारिका आणि सहाय्यक आरोग्य सेविकांना सध्या त्यांचे काम सोडून डेटा एन्ट्री ऑपरेटरचे काम करावे लागत आहे. नागरी आरोग्य केंद्रात एक डाटा एंन्टूी ऑपरेटर आवश्यक असतानाही प्रशासनाकडून दिला जात नाही. सर्व डाटा एंन्ट्री ऑपरेटरांना मुख्यालयात काम करण्यास सांगण्यात आले आहे. सहाय्यक आरोग्य सेविका आणि परिचारिकांना फिल्डचे काम करून आल्यावर त्याचा ५ ते ६ वेळा लेखी अहवाल बनवावा लागत असून नंतर त्याबाबत संगणकातही माहिती फिड करून ठेवावी लागत आहे. गर्भवती माता, नवीन दांपत्य, लहान मुले यासह लसीकरणाची कामेही आरोग्य सहाय्यक करत आहेत. १५ ते १७ हजार लोकसंख्येचा विभाग एका सहाय्यक आरोग्य सेविकांवर सोपविण्यात येत आहे. यामध्ये रजिस्टरमध्ये सर्व माहिती नमूद करून पुन्हा संगणकीय नोंदीही कराव्या लागत आहेत. गर्भवती माता असल्यास पाच ते सहा वेळा भेटी देवून तिचा वेळोवेळी अहवाल बनवावा लागत आहे,. याशिवाय मुख्यालयातून सतत फोन येत असून आरोग्य सहाय्यकांकडे वेगवेगळ्या अहवालाची मागणी करण्यात येते. मग सर्व काम सोडून संबंधित अहवाल पाठविण्यास प्राधान्य द्यावे लागते. अनेकदा संगणकावर माहिती फिड करण्याचे काम स्टाफ नर्सलाही करावे लागते. अनेकदा संगणकावर लिपिक कामासाठी बसलेला असताना त्या लिपिकाला संगणकावरून उठविता येत नाही. त्या लिपिकाचे काम संपल्यावर सहाय्यक आरोग्य सेविकांना संगणक उपलब्ध होतात. आरोग्य विषयक कामाचा अहवाल फाईलीमध्ये तसेच संगणकावरही नियमित फिड करावा लागत असल्याने पुरेशा प्रमाणात संगणक उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे रवींद्र सावंत यांनी म्हटले आहे.
अनेक सहाय्यक आरोग्य सेविका आणि परिचारिकांचे (एल.एच.पी) ट्रेनिंग होवून ४ वर्षे उलटले तरी त्यांना त्या धर्तीवर पदोन्नती दिली जात नाही तसेच वेतनही दिले जात नाही. सध्या पालिका प्रशासनाकडून ‘मिशन इंद्रधनुष्य’चे काम सुरू असून त्याअर्ंतगत घरोघरी जावून लसीकरणासाठी लाभार्थीचा वेगवेगळा अहवाल बनवावा लागत आहे. सहाय्यक आरोग्य सेविकांना पालिका मुख्यालयात मिटींग करता बोलवून रात्री ९ ते ९.३० पर्यत थांबवून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. या महिला कर्मचार्यांना घरी पोहोचण्यास रात्रीचे बारा वाजतात, पुन्हा सकाळी ८.३० वाजता कामावर यावे लागते. ही कामगारांची जाणिवपूर्वक छळवणूक होत असून यामुळे कामगारांच्या सेवेवर परिणाम होण्याची भीती आहे. मिटींगला बोलविल्यावर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक आरोग्य सेविकांशी अपमानास्पद भाषेत बोलतात. बोलण्यातील सूरही अरेरावीचा आणि दादागिरीचा असतो. याशिवाय भ्रमणध्वनी बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात. यादरम्यान कोणाच्या घरी कोण दगावल्यास अथवा दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल रवींद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.
सहाय्यक आरोग्य सेविकांचा अपमान करण्याचा, अपमानास्पद भाषेत संभाषण करण्याचा आणि अरेरावीचे वर्तन करण्याचा अधिकार आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्यांना कोणत्या नियमात दिला आहे, घटनेत तशी तरतूद आहे का, याचा लेखी खुलासा प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे. सहाय्यक आरोग्य सेविका अथवा परिचारिका या महापालिका प्र्रशासनाच्या कर्मचारी आहेत, गुलाम नाहीत. त्यांना मान-सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. उद्या या कर्मचार्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास त्यातून वरिष्ठ अधिकार्यांबाबतीत गैरप्रकार घडल्यास यातून पालिका प्रशासनाची उभ्या महाराष्ट्रात नाचक्की होवून महापालिकेची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता आहे. असा प्रकार नजीकच्या काळात घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा रवींद्र सावंत यांनी यावेळी दिला.
आरोग्य विभागातील कर्मचार्यांवर होत असलेला अन्याय तात्काळ थांबवून त्यांना मान-सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. परिचारिका व सहाय्यक आरोग्य सेविकांना त्यांच्या आठ तासाच्या वेळेतच काम करवून घ्यावे. सांयकाळी उशिरापर्यत त्यांना थांबविता कामा नये. बैठकीत कर्मचार्यांशी होत असलेले गैरवर्तन, अरेरावी, अपमानास्पद भाषा तात्काळ बंद झाली पाहिजे. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात डाटा एंन्ट्री ऑपरेटर उपलब्ध करून द्यावा. साप्ताहिक सुट्टी तसेच सार्वजनिक सुट्ट्या त्यांना मिळाल्याच पाहिजे. घरी जावूनही प्रशासकीय काम करण्याविषयीची सक्ती तात्काळ थांबविली पाहिजे. आरोग्य विभागात तुघलकी कारभार थांबवून कामगारांवरील अन्याय दूर न झाल्यास पालिका मुख्यालयासमोर इंटकच्यावतीने आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी, असे सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.