नवी मुंबई : एल्फिन्स्टन-परळ पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ निरपराध नागरिकांचा बळी गेला. याचा राग व्यक्त करण्यासाठी व प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ५ ऑक्टोबरला राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो सिनेमा ते चर्चगेट पर्यंत धडक मोर्च्याचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई मनसे तर्फे विविध रेल्वे स्थानकांत बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व रेल्वे प्रवाश्यांना उद्याच्या धडक मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले व याप्रसंगी पत्रके सुद्धा वाटण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेरुळ, सिवूड्स, वाशी, सानपाडा, जुईनगर, बेलापूर, तुर्भे, ऐरोली, घणसोली व कोपरखैरणे या नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांत श्रद्धांजली अर्पण केली व नागरिकांशी संवाद साधला. रोजच्या प्रवासादरम्यान येत असलेल्या समस्या, अडचणी व असुविधांबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी नागरिकांकडून यावेळी माहिती घेतल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यावेळी नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा मनसे पदाधिकाऱ्यांना वाचून दाखवला. कित्येक रेल्वे स्थानकांमध्ये अस्वच्छता, जिने तुटलेल्या अवस्थेत, ट्रेनचे इंडिकेटर नादुरुस्त, पिण्याची पाणपोई मध्ये तर नळच गायब असणे, जागोजागी पान खाऊन झालेली अस्वच्छता असणे,तिकीट खिडक्या बंद असणे, फेरीवाल्यांनी रेल्वे स्थानकात जागोजागी केलेले अतिक्रमण अशा विविध समस्या असल्याचे सांगितले.
या विविध रेल्वे स्थानकांत वेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, निलेश बाणखेले, विनोद पार्टे, डॉ.आरती धुमाळ, अनिथा नायडू, सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, नितीन चव्हाण, स्वप्नील गाडगे, अभिजित देसाई, नितीन खानविलकर, विलास घोणे, विठ्ठल गावडे, संप्रीत तुर्मेकर, बाबाजी गोडसे, विक्रांत मालुसरे, अभिलेश दंडवते, सचिन कदम, अप्पासाहेब कोठुळे,विनय कांबळे, अमोल ऐवळे, राजेश ढवळे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.