स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : भारतात पहिल्यांदाच होणा-या फिफा 17 वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईत फुटबॉलच्या माध्यमातून क्रीडामय वातावरण निर्माण झालेले दिसून येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने या स्पर्धेच्या निमित्ताने देशापरदेशातून येणा-या खेळाडूंच्या व क्रीडा रसिकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. या अनुषंगाने आज सकाळी 7 वाजता सेक्टर 36 नेरुळ येथील गणपत शेठ तांडेल मैदान येथून खेळातून व स्वच्छतेतून आरोग्य हा संदेश प्रसारित करीत भव्यतम वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 112 शाळांमधील 40 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याव्दारे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नवीन विक्रमाची नोंद होणार आहे.
या वॉकेथॉन उपक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, उप महापौर श्री. अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन, पोलीस आयुक्त श्री. हेमंत नगराळे, स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, परिवहन समिती सभापती श्री. प्रदिप गवस, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती श्री. विशाल डोळस, स्वच्छ नवी मुंबई तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, नवी मुंबई स्वच्छता मिशनचे ब्रँड अँबेसॅडर सुप्रसिध्द गायक श्री. शंकर महादेवन, डॉ. डि.वाय. पाटील समुहाचे प्रमुख श्री. विजय पाटील आणि महानगरपालिकेच्या विविध समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, परिवहन समिती सदस्य, अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. 06 ऑक्टोबर पासून नेरुळ येथील डॉ. डि.वाय.पाटील स्टेडीयममध्ये फिफा 17 वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत असून नवी मुंबई शहराला यजमानपदाचा बहुमान मिळालेला असून या पार्श्वभूमीवर शहरात फुटबॉलमय वातावरण आहे. महाराष्ट्र शासनानेही महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम हाती घेतला असून खेळाच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण जीवनाचा संदेश प्रसारित केला जातो आहे. फिफा स्पर्धेच्या अनुषंगाने शहरात क्रीडामय वातावरण निर्माण व्हावे तसेच नुकत्याच स्वच्छ भारत अभियांनांतर्गत झालेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशात आठव्या व महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून मानांकीत झाले असल्याने स्वच्छतेचे हे मानांकन उंचावण्यासाठी खेळातून व स्वच्छतेततून आरोग्य हा संदेश “फुटबॉल कार्निवल विथ वॉकेथॉन” व्दारे प्रसारित करण्यात आला.
यापूर्वी सन 2015 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने स्मार्ट व स्वच्छ नवी मुंबई वॉकेथॉन आयोजित केले होते. त्यामध्ये 27 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये राष्ट्रीय विक्रमी नोंद झालेली होती. या वॉकेथॉनचा नवी मुंबई महानगरपालिकेचाच यापुर्वीचा विक्रम आज 40 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी वॉकेथॉनमध्ये सहभागी होत मोडला व नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
से. 36, नेरुळ करावे येथील गणपतशेठ तांडेल मैदान येथील कार्यक्रमात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते वॉकेथॉनची मशाल प्रज्वलीत करण्यात आली. महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांचेसमवेत 40 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रॅँड अँबेसॅडर श्री. शंकर महादेवन याप्रसंगी फिफा फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने नविन जिंगल सादर केली. जोसेफ ब्रदर्स यांनी सादर केलेल्या स्वच्छतेविषयी पॉप गीताला तसेच फुटबॉल जगलरीच्या सादरीकरणाला व कलाकारांना विद्यार्थ्यांनी टाळ्यांची दाद दिली. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 6 व 112 करावे यांनी लेझीमच्या प्रात्यक्षिकातून एन.एम.एम.सी. ही अक्षरे साकारली. डि.ए.व्ही. पब्लीक स्कुल नेरूळ व एस.एस. हायस्कुल सिवूड यांनी मार्चपासव्दारे मानवंदना दिली. नवी मुंबई पोलीस बँड पथकानेही वादनाव्दारे मानवंदना दिली.
मान्यवरांच्या शुभहस्ते वॉकेथॉनचा फलक फुग्यांव्दारे हवेत सोडण्यात आला. मान्यवरांनी झेंडा दाखवून ही वॉकेथॉन महापालिका मुख्यालयाच्या दिशेने बेलापूरकडे व नेरूळच्या दिशेने रामलिला मैदानापर्यंत स्वच्छता व फिफाचे फलक उंचवत खेळातून व स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश प्रसारित करत यशस्वीरित्या पार पडली. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये होणार असल्याने तसेच हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम असल्याने 112 शाळांतील 40 हजाराहून अधिक विद्यार्थी वॉकेथॉनमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.