स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नांदेड : नांदेडच्या विकासाचे दावे करणार्यांनी आपल्या सलग वीस वर्षांच्या सत्ताकाळात नेमका काय विकास केला, असा सवाल कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. ’गुरू ता गद्दी’ सोहळ्यासाठी २००७ सालापासून केंद्र सरकारकडून आलेला जवळपास चौदाशे कोटींपेक्षा अधिकचा निधी खर्चूनही शहरात दाखवण्याजोगे एकही विकास काम दिसत नाही. मात्र नांदेड महापालिकेत भाजपची सत्ता नसताना कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता महापालिकेच्या दीडशे कोटींच्या कर्जाची हमी राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने घेतली, अन्यथा त्या कर्जाचे पुनर्गठन न होता,शहरातील पायाभूत सुविधा ठप्प झाल्या असत्या. हा भाजपच्या पारदर्शक कारभाराचा एक नमुना असून याच पद्धतीने पुढच्यास काळातही महापालिकेत कारभार केला जाईल, अशी हमी त्यांनी दिली.
कॉंग्रेसच्या महापालिकेतील कारभाराची पोलखोल करताना कामगार मंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, गुरू ता गद्दी सोहळ्यासाठी आलेला निधी ही खरे तर शहर विकासासाठीची सुवर्णसंधी होती. हा निधी पुढील पंचवीस वर्षांच्या शहराच्या गरजा ध्यानात ठेवून योग्य पद्धतीने खर्च करणे आवश्यक होते. मात्र टक्केवारीच्या नादात कोणतेही नियोजन न करता हा निधी खर्च केल्याने शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा योजनांचा पुरता बोजवारा उडाल्याचा आरोपही त्यांनी केला. नांदेड शहरातील एमआयडीसीची स्थितीही काहीशी या पायाभूत सुविधांसारखीच झाली आहे. एमआयडीसीतले ७० टक्के उद्योग बंद आहेत. पिण्याचे पुरेसे पाणीही मिळेनासे झाले आहेत. हे सर्व चित्र बदलायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यास पारदर्शक कारभार करतानाच शहरासाठी केंद्र आणि राज्याकडून अधिक निधी आणण्याला आमचे प्राधान्य असेल, तसेच महापालिकेतील आर्थिक भ्रष्टाचारही निपटून काढण्याची ग्वाहीदेखील कामगार मंत्र्यांनी दिली.