स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई, : लोकनेते गणेश नाईक यांच्या स्कूल व्हिजनमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच पाश्चात्य शाळेत ज्या पध्दतीने शिक्षण दिले त्या आधुनिक पध्दतीने शिक्षण देण्यासाठी डिजीटल प्रणाली महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा पालिकेच्या माध्यमातून डिजीटल करण्याची घोषणा आमदार संदीप नाईक यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक-४६ चे नगरसेवक शंकर मोरे यांच्या मागणीनुसार आ.संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून नवी मुंबईतील पहिल्या कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक-३५ मध्ये डिजीटल शिक्षण सुविधा सुरु करण्यात आली असून त्याचे लोकार्पण आ.नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला महापौर सुधाकर सोनावणे, सभागृह नेते जयवंत सूतार, पालिकेचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे, माजी नगरसेविका चंद्रभागा मोरे, पालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक मढवी, प्रशासन अधिकारी सुर्यवंशी, स्वच्छता अधिकारी खोटे, प्रतिभा नर्सिंग इन्स्टिटयुचे संस्थापक डॉ.प्रतिक तांबे, स्कुल कमिटीच्या अध्यक्षा सुषमा वैण्णव, माजी अध्यक्षा निर्मला शेलार, शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील, ठेकेदार निलेश परदेशी, शाळेच्या वर्गात माहितीपर थ्रीडी चित्ररेखाटन करणारे विघ्नेश घरत आदी मान्यवर शिक्षक-कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्ररेखाटन करणारे विघ्नेश घरत, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातून निवड झालेल्या मयुर अशोक खताळचा गौरव करण्यात आला.
आमदार नाईक यांनी वॉटर, मीटर, गटरच्या कामापेक्षा वैविध्यपुर्ण कामांसाठी आमदार निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत पाच लाख रुपयांचा निधी पालिकेच्या शाळा क्र-३५ ला डिजीटल करण्यासाठी दिला होता. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी संगणकाच्या मदती देणारी शिक्षण प्रणाली शाळेत सुुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना व्हिडिओ-ऑडिओ पध्दतीने अभ्यासाची माहिती घेता येणार आहे. त्याच बरोबर या डिजीटल शाळेच्या वर्गात सजीवसृष्टी व पर्यावरण, आदिमानवापासून मानवाचा झालेला उगम, आंतराळातीची माहिती देणारा अंतराळवीर कक्ष, समुद्राच्या तळाशी असणार्या जीव सृष्टीची माहिती देणारे चित्र, कला आणि संस्कृतीची माहिती देणारी आर्कषक व अप्रतिम रेखाटन करण्यात आले आहे. यामुळे शाळेच्या वर्गात गेल्यानंतर आपसुकच विद्यार्थ्यांंमध्ये शाळेची ओढ लागणार आहे.
लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पालिका शाळांना सक्षम करण्याची भुमिका घेतली होती. त्याच्या या दुरद्ृष्टी विचारामुळे स्कुल व्हिजन राबविण्यात आले. या अभियानामुळे पालिकेच्या शाळेची गुणवत्ता वाढली आहे. त्याचबरोबर पालिका शाळेचा निकाल १०० टक्के लागत असून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, आंतरराष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावर चमकले आहेत. आमदार निधीतून साकारलेल्या डिजीटल शाळेमुळे आणि भविष्यात होणार्या सीबीएससी शाळांमुळे लोकनेते नाईक यांना अभिप्रेत असणारी शैक्षणिक क्रांती घडत असल्याचे आ.नाईक यांनी सांगितले. शाळा क्रमांक-३५ च्या हिंदी माध्यमाच्या डिजीटल सुविधेसाठी १० लाखांचा आमदार निधी देणार असल्याचे आ.नाईक म्हणाले. नवी मुंबईतील पालिका व खाजगी शाळांच्या समस्या जाणुन घेऊन आपण हिवाळी अधिवेशनात त्या मांडणार असल्याचे आ.नाईक म्हणाले.पालिकेच्या सर्व शाळा डिजीटल करण्याची मागणी महापौर सुधाकर सोनावणे यांच्याकडे केल्याचे आ.नाईक म्हणाले.
महापौर सुधाकर सोनावणे यांनी डिजीटल शाळेमुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागेल आणि पालिका शाळेतील पटसंख्या अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करीत पालिकेच्या शिक्षण मंडळाचे कौतुक केले. पालिकेचे शिक्षणाधिकारी संगवे यांनी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक पध्दतीचे शिक्षण देण्या बरोबरच सर्व विद्यार्थ्यांना सकस आहार देणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या निकम यांनी तर आभार मधुकर गायकवाड यांनी मानले.
आ.संदीप नाईक यांनी शाळेत झालेल्या पालकसभेत आमदारनिधीतून शाळेचे आधुनिक पध्दतीने डिजीटलायझेशन करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता झाल्याबद्ल आनंद व्यक्त केला. पालिकेच्या शाळा क्रमांक-३५ मध्ये तीन शाळा असून मराठी व हिंदी माध्यमाचे वर्ग भरतात. डिजीटल सुविधेमुळे या मुलांना आधुनिक शिक्षण घेता येणार आहे.
-शंकर मोरे, नगरसेवक प्रभाग-३५.
शाळा क्र-३५ मधील विद्यार्थ्यांना आधुनिकपध्दतीने आता शिक्षणाचे धडे गिरवता येणार आहेत. त्याच बरोबर शाळेतील वर्गात करण्यात आलेली सजावट यामुळे ही विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढणार आहे. नगरसेवक शंकर मोरे यांच्या पुढाकाराने आ.संदीप नाईक यांच्या आमदार निधीने साकारलेल्या डिजीटल सुविधेच्या माध्यमातून सर्व सामान्य घरातील विद्यार्थी जगाशी जोडले जाणार आहे. शाळेच्या आजवरच्या यशात शिक्षकांचा देखील मोलाचा वाटा आहे.
-पुष्पलता पाटील, मुख्याध्यापिका.