स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : धार्मिक प्रार्थनास्थळांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक धार्मिक स्थळांच्या संस्थांना बोलावून प्रथम त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे मात्र असे होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या विरोधात प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा लोकनेते गणेश नाईक यांनी दिला आहे.
नवी मुंबई धार्मिक स्थळे बचाव समितीच्यावतीने सर्वधर्मसमभाव संमेलन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारी सकाळी भरविण्यात आले होते. या समितीच्या वतीने लोकनेते गणेश नाईक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन आदी सर्वधर्मीय प्रतिनिधी या संमेलनास मोठया संख्येने उपस्थित होते. राज्य शासनाने स्थापन केलेल्या महापालिकास्तरीय समितीने नवी मुंबई पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर धार्मिक प्रार्थना स्थळांवर तोडक कारवाई सुरु केली आहे. उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकनेते गणेश नाईक यांनी धार्मिक प्रार्थना स्थळांबाबतचे न्यायालयीन आदेश, शासकीय निर्णय, जनतेच्या भावनांचा उहापोह केला. आपल्या मार्गदर्शनाच्या सुरुवातीला लोकनेते नाईक यांनी स्पष्ट केले कि, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आणि सरकारचा जी.आर. यांच्यामधील त्रुटी सुधारण्यासाठी आम्हाला एक संधी हवी आहे त्या दृष्टीने भूमिका घेण्यासाठी आपण सर्व एकत्र जमलो आहोत. समितीने माझ्यावर जी मार्गदर्शनाची जबाबदारी टाकली आहे तिचा मी विनम्रपणे स्वीकार करतो असे त्यांनी नमूद केले. धार्मिक प्रार्थना स्थळांबाबतच्या गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या सर्वात पहिल्या आदेशाविषयी माहिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातील निकाल विषद करून या निकालानुसार महाराष्ट्र शासनाने धार्मिक प्रार्थना स्थळांबाबत कार्यवाही करण्यासाठी राज्यस्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि महापालिकास्तरीय समिती अशा तीन स्तरीय समित्यांची स्थापना केल्याचे लोकनेते म्हणाले. शासन नियमानुसार अ, ब आणि क अशी धार्मिक स्थळांची वर्गवारी महापालिकास्तरिय समितीने करणे गरजेचे आहे. कोणती धार्मिक स्थळे नियमित होऊ शकतात, कोणती धार्मिक स्थळे नियमित होऊ शकत नाहीत, कोणती धार्मिक स्थळे स्थलांतरित होऊ शकतात त्यांचा समावेश या वर्गवारीत करायला हवा. कारवाई करण्यापूर्वी प्रत्येक धार्मिक स्थळांच्या संस्थांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे त्यांना सुनावणी दिल्यानंतरच या बाबतचा लेखी निर्णय द्यावा असा शासन निर्णय आहे. परंतु नवी मुंबई पालिका क्षेत्रात महापालिकास्तरिय समितीने केवळ वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन धार्मिक स्थळांवर कारवाई आरंभली आहे. धार्मिक स्थळांच्या संस्थांचे म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी कारवाई सुरूच राहिली तर प्रसंगी महात्मा गांधींच्या विचारानुसार सत्याग्रह करण्याची तयारी देखील असल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. धार्मिक स्थळांबाबत तोडगा निघणारच आणि मी तो काढणारच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी हिंदू समाजाचे महादेवबुवा शहाबाजकर यांनी धार्मिक स्थळे म्हणजे प्रत्येक धर्माचे श्रद्धास्थान असल्याचे सांगत या धार्मिक स्थळांवर कारवाई होउ नये यासाठी लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी साजिद अहमद म्हणाले कि, २०० वर्षांपूर्वीच्या धार्मिक स्थळांना देखील नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत यामध्ये आम्हाला आमची बाजू न्यायालयात मांडण्याची एक संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करीत नवी मुंबई शहरातील सर्वधर्मीय नागरिकांच्या भावना फक्त गणेशजी नाईक समजू शकतात आणि इतर कोणालाही त्या समजू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बौद्ध समाजाचे प्रतिनिधी दिलीप जगताप यांनी नवी मुंबईत शहरात आलेला प्रत्येक नागरिक एक स्वप्न घेऊन आला असल्याचे म्हणाले. नवी मुंबई शांत आणि सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाते आणि हे शहर घडविणारे म्हणून लोकनेते गणेश नाईक यांना ओळखले जाते, असे जगताप म्हणाले. नवी मुंबई शहरात धार्मिक स्थळांवर होणारी कारवाई थांबावी म्हणून आम्ही आमच्या पालकांकडे म्हणजेच लोकनेते गणेश नाईक यांच्याकडे जायचे ठरविले आणि आलो आहोत त्यांनी यातून तोडगा काढावा अशी विनंती केली. त्यानंतर ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी पास्टर फिलिप्स यांनी न्यायाचे पालन व्यवस्थित होत नसल्याने शहरातील नागरिक घाबरलेल्या परिस्थितींमध्ये आहेत. न्यायालयाचे आदेश आणि होणारी कार्यवाही यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे सांगत या कारवाया फक्त नवी मुंबई शहरात होत असल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाया थांबण्यासाठी आम्हाला मोठ्या नेत्याच्या मार्गदर्शनाची गरज असून हे फक्त आणि फक्त लोकनेते गणेश नाईकच करू शकतात असे ते म्हणाले. त्यानंतर जैन समाजाचे प्रतिनिधी अभय कोटेच्च यांनी सांगितले की काही दिवसांपासून आमच्या धार्मिक स्थळांवर कारवाया होत आहेत जर आमच्या श्रद्धास्थानांवर कारवाया होत असतील तर आमचा जगून काय उपयोग? असा सवाल करीत हि लढाई लढावी लागेल परंतु हि लढाई कोण्या एकट्याची नसून या लढाईला मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आणि या लढाईचे नेतृत्व फक्त गणेश नाईक करू शकतात त्यांनी नेतृत्व करावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांनी लोकनेते नाईक यांना केली. शीख समाजाचे प्रतिनिधी दलबीर सिंग यांनी लोकनेते नाईक यांनी आज हातात घेतलेलं कार्य हे धार्मिक कार्य असून कोणत्याही धर्माच्या नागरिकांना येणार्या समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबईमध्ये गणेश नाईक हा मोठा आधार असल्याचे सांगत आम्ही सर्वजण नेहमीच त्यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ठ केले. या कार्यक्रमाला आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड. जब्बार खान, सेवादल सेलचे जिल्हाध्यक्ष दिनेश पारेख, सभागृहनेते जयवंत सुतार, राष्ट्रवादीचे पालिकेतील पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, धार्मिक स्थळे बचाव समितीचे समन्वयक शिरीष वेटा, सर्वधर्मिय पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.