अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबईकरांना विद्युत वितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता भारनियमनाच्या खाईत लोटले आहेत, ही सर्वप्रथम संतापजनक बाब असून आम्ही त्याचा निषेध करत आहोत. नवी मुंबई शहर भारनियमनमुक्त असावे यासाठी नवी मुंबईकरांकडून प्रति यनिटमागे ४६ पैसे आकारण्यास पाच वर्षापूर्वीच सुरूवात केलेली आहे. भारनियमन नसावे म्हणून या प्रति युनिटमागील ४६ पैशाचा तुघलकी करही नवी मुंबईकरांनी नाईलाजास्तव मान्य केला असून आजही या कराचा वीज बिलाच्या माध्यमातून भरणा करत आहेत. त्यामुळे हा अतिरिक्त ४६ पैशाचा कर भरत असतानाही नवी मुंबईकरांना भारनियमनाच्या संकटात टाकण्याचा निर्णय कोणत्या अधिकारात घेण्यात आला आहे, याचा सर्वप्रथम लेखी स्वरूपात खुलासा होणे आवश्यक आहे. सर्वप्रथम नवी मुंबईकरांना भारनियमनातून वगळण्यातच यावे अशी मागणी शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी एमएसईडीसीच्या कार्यकारी उपअभियंत्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
मुलांच्या सहामाही परिक्षा सुरू आहेत. सध्या कमालीचा उकाडा सुरू आहे. घरात पंखाच नव्हे तर एसी लावूनही गर्मी जाणवत आहे. अशा परिस्थितीत भारनियमन कोणत्या निकषावर लादले आहे, तेच समजत नाही. या उकाड्यात मुलांनी अभ्यास करावा अशी तुमची भूमिका आहे काय? मुलांना दिवसाचे तीन तास उकाड्यात अभ्यास करावा लागणार, याकडे लक्ष देवून नवी मुंबईतील भारनियमन तात्काळ बंद करावे असे नगरसेविका सुनिता मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्या दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळी हा सणाचा राजा मानला जात आहे. सणाच्या अगोदरच १५ दिवस घराघरात महिलांची दिवाळीचा फराळ बनविण्याची लगबग सुरु असते. अशा उकाड्यामध्ये महिलांना दिवाळीचा फराळही बनविणे शक्य होणार नसल्याने भारनियमनाचा निर्णय मागे घेवून नवी मुंबईकरांवर लादण्यात आलेली भारनियमनाची सक्ती मागे घेण्यात यावी तसेच भारनियमनाची वेळ ठरविताना तुम्ही कोणाशीही विचारनिमिय केलेला नाही तसेच त्या त्या परिसरातील परिस्थितीतीचा अभ्यासही केलेला नाही. सकाळी ७.३० ते ९.१५ आणि दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत भारनियमन नेरूळवासियांवर लादलेलेे आहे. सकाळी ७,३० वाजता घरातील महिलांना कामावर जाणार्या माणसांचे जेवण बनविण्याची वेळ, मुलांची आंघोळ-नाष्टा करण्याची वेळ, तसेच लादी स्वच्छतेची आणि कपडे धुण्याची वेळ असते. त्यातच याच वेळेस महापालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्यांना पाणीपुरवठाही उपलब्ध करून दिला जात आहे. नेरूळ पश्चिमेकडील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मोटर लावून पाणी घरामध्ये चढवावे लागत आहे. याच सुमारास वीज गेल्यास घरात पाणी कसे भरायचे, सकाळचा नाष्टा कसा करायचा, कपडे धुणे, लादी स्वच्छता अशा कामांमध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. मुळातच भारनियमनाची अंमलबजावणी करण्यापूर्वी आपण प्रभागाप्रभागात जनजागृती केली असती तर आपणास भारनियमनाची वेळही ठरविणे सोयिस्कर झाले असते असे नगरसेविका सुनिता मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
भारनियमनातून मुक्तता मिळविण्यासाठी नवी मुंबईकर गेल्या काही वर्षापासून प्रति युनिट ४६ पैशाचा भरणा करत आहेत. मुलांच्या सहामाही परिक्षा सुरू आहे, या भारनियमनामुळे त्यांच्या अभ्यासाचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे. तसेच दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांवर लादण्यात आलेले भारनियमनाचे संकट लवकरात लवकर दूर करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आम्हाला महिला समवेत ठिय्या आंदोलन करावे लागेल असा इशारा नगरसेविका सौ. सुनिता मांडवे यांनी निवेदनातून दिला आहे.