नवी मुंबई :- विजेची देयके वेळच्या वेळी भरूनही ऑक्टोबर हिटच्या झळा भेडसावत असताना भारनियमन सुरु झाल्यामुळे महाराष्ट्र तसेच नवी मुंबईकर त्रासले आहेत. भारनियमनाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईतील वाशी बोनकोडे गावातील विमल नारायण पाटील या ७३ वर्षीय वृद्ध महिलेला देण्यात येत असलेला कृत्रिम श्वासोच्छ्वास वीज खंडित झाल्यामुळे बंद झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोणतीही पूर्व कल्पना न देता तसेच अवेळी भारनियमन करणाऱ्या व वृद्ध महिलेचा बळी घेणाऱ्या राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वीज महावितरणचे वाशी परिमंडळातील अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मोठ्या थाटामाठात देशाचे पंतप्रधान यांनी प्रत्येक घरात २०१८ पर्यंत वीज पोहचवू अशी घोषणा करून १०० तास सुद्धा उलटले नाहीत आणि भारनियमनामुळे नवी मुंबईत वृद्ध महिलेचा जीव गेला. एका बाजूला शेतकऱ्यांचे बळी, रेल्वे प्रवाश्यांचे बळी आणि आता भारनियमनामुळे बळी, हे सरकार आहे की कसाई ? असा प्रश्न विचारत तुमची “सौभाग्य योजना” घाला चुलीत, इथे आमच्या आया बहिणींना जिवंत राहू द्या असा उद्वेगजनक सवाल मनसेने प्रसिद्धीपत्रकात विचारला आहे.
वीज वितरणच्या वाशी परीमंडळात आजच्या घडीला नऊ लाख वीज ग्राहक आहेत. राज्यात सर्वाधिक वीज देयकाची वसुली होत असलेले परिमंडळ म्हणून वाशी परिमंडळ ओळखले जाते. या परिमंडळात फक्त आठ टक्के थकबाकी आहे तरी इथे भारनियमन का ? असा प्रश्न नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे.
ही वस्तुस्थिती सुधारा आणि नवी मुंबईतील भारनियमन बंद करा अन्यथा कायदा हातात घेऊ व वीजवितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.