सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबईतील शहर आणि गावठाण क्षेत्रात गेली अनेक दिवस रोजच वीज पुरवठा खंडीत होतो आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास होत असून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी लेखी मागणी आमदार संदीप नाईक यांनी महावितरणचे अधिक्षक-अभियंता श्री. मानकर यांना गुरुवारी वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून केली आहे.
ऑक्टोबर हिटमुळे सध्या वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला आहे. विद्यार्थी वर्गाच्या परीक्षाही सुरु आहेत. सकाळच्या आणि सायंकाळच्या कामाच्या वेळेत रोजच वीजपुरवठा खडीत केला जातो. नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी सर्वांचीच कामे ठप्प होतात. दिघा, ऐरोली, रबाळे, तळवली, घणसोली, कोपरखैरणे, महापे, पावणे, वाशी, तुर्भे, जुईनगर, सानपाडा, नेरुळ, सीबीडी, बेलापूर आणि सभोवतालच्या परिसरात जाचक भारनियमन सुुरु आहे. या भारनियमनाविरोधात नागरिकांच्या मनात महावितरणविषयी प्रचंड संताप असून नवी मुंबईत ज्या ज्या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडीत होतो तो सुरळीत करावा आणि नागरिकाना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि वीज समस्या सोडविण्यासाठी आमदार नाईक यांनी वेळोवेळी राज्याचे उर्जामंत्री आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना लेखी निवेदन देवून वीज समस्यांचे निराकरण करण्याची मागणी लावून धरली आहे.