स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नांदेड : कॉंग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणार्या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्र. १ व २ मधील कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तरोडा येथील भवानी चौकात रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप, मा. आ. कल्याण काळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, संजय देशमुख लहानकर, संतोष पांडागळे व दोन्ही प्रभागातील कॉंग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, शहराचा विकास कॉंग्रेसच्या कार्यकाळातच झाला आहे. गुरु-ता-गद्दी तसेच नांदेड शहराचा जेएनयुआरएम योजनेत समावेश झाल्याने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अडीच हजार कोटींचा निधी दिला होता. या निधीच्या माध्यमातून शहरातील बाह्य वळण रस्ते, उड्डाणपूल, जलकुंभ, स्टेडियम, विमानतळ, झोपडपट्टी वासियांना पक्की घरे यासह अन्य विकासकामे करण्यात आली. यामुळे शहराचा खर्या अर्थाने विकास झाला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात शहरासाठी कोणताही विकास निधी दिला नाही. स्मार्ट सिटी योजनेचे निकष पूर्ण केल्यानंतर नांदेड शहराचा या योजनेत समावेश केला नाही. या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या निवडणुकीत मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजप सरकारने दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली. मात्र गेल्या दोन वर्षात फक्त सहा लाख युवकांनाच रोजगार मिळाला. नोटाबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला असून अनेकांचा रांगेत मृत्यू झाला. रेशनिंगवर मिळणारी साखर भाजप सरकारने बंद केली. गोरक्षणाच्या नावाखाली दलित अल्पसंख्याक समाजाच्या लोकांच्या हत्या सुरु आहेत. या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड असंतोष असून भाजप सरकारच्या परतीच्या प्रवासास नांदेडातून सुरुवात करा असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी मतदारांना केले.
यावेळी माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप मा. आ. कल्याण काळे, यांनीही भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली कॉंग्रेस तसेच खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वातच नांदेडचा विकास होऊ शकतो, यासाठी कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. या प्रचारसभेस प्रभाग क्र.१ व २ मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.