स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : स्वपक्षाच्या नगरसेविकेच्या नागरी कामाचे उद्घाटन सोहळा, त्यासाठी चमकेश लोकांची धावपळ, त्याचवेळी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या विद्युत डीपीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागते. कार्यक्रम सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वॉर्ड अध्यक्ष आग विझविण्यासाठी धावतो अन् आग विझवून पुन्हा कार्यक्रमात सहभागी होतो. कोणाला काही मागमूसही नसतो. तो वॉर्ड अध्यक्ष म्हणजे प्रभाग ८६ चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महादेव पवार होय.ढ़
मुळचे मनसैनिक असलेले सातारा भागचे नेरूळ सेक्टर सहामधील एव्हरग्रीन सोसायटीतील रहीवाशी. २०१०च्या महापालिका निवडणूकीत मनसेच्या वतीने महादेव पवारांनी निवडणूकही लढविली होती. २०१५ सालच्या निवडणूकीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे युवा नेतृत्व सुरज पाटील यांच्या कार्यप्रणालीकडे आकर्षित होत महादेव पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सुरज पाटलांमुळे त्यांना प्रभाग ८६चे राष्ट्रवादी कॉंग्रेस वॉर्ड अध्यक्ष पदही मिळाले.
रविवार,दि. ८ ऑक्टोबर, सांयकाळचे ७ वाजलेले. पाऊस रिपरिप सुरूच होता. नेरूळ सेक्टर सहामधील कै. राजमाता जिजाऊ उद्यानात प्रभाग ८५ आणि ८६ मधील नागरी कामाचा उद्घाटन सोहळा सुरू होता. कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक सुरज पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, प्रभाग ८६च्या नगरसेविका आणि महापालिकेच्या उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्यासह स्थानिक भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू असताना मागील बाजूस नागरिकांशी चर्चा करत असताना महादेव पवारांना लगतच्या एका सिडको सोसायटीतील विद्युत डीपीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते. कार्यक्रमातून कोणाला काही न सांगता महादेव पवार पळत त्या सिडको सोसायटीकडे धाव घेतात. सोसायटीतील रहीवाशी एमएसईडीसीला तसेच अग्निशमनला फोन करण्यासाठी धावपळ करत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ डीपीची पाहणी करत पळत जावून शेजारील माती डीपीमध्ये टाकली. आगीचे प्रमाण पाहून एक रेतीची गोण लगतच्या भागातून आणून स्वत: त्या डीपीमध्ये आगीवर रेती टाकून आग विझविली. सोसायटीतील एका नळावर हात स्वच्छ करून महादेव पवार पुन्हा कार्यक्रमात सहभागी होतात. अवघ्या १० मिनिटाचा हा प्रकार. कार्यक्रमातील कोणाला काय घडले माहितीही नसते. कार्यक्रम सुरुच असतो. तेवढ्या वेळात महादेव पवारांनी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता त्यांच्या जनसेवेचा कार्यभारही उरकलेला असतो.