स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : फिफा 17 वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका यजमान शहर म्हणून देशीपरदेशी खेळाडूंच्या स्वागतासाठी सज्ज असून शहरातील विविध चौक, मोकळ्या जागा यांचे विशेष सुशोभिकरण करण्यात येऊन शहराचे रुप पालटले आहे. यामध्ये फिफाच्या माध्यमातून फुटबॉल खेळाच्या प्रचारासोबतच युवक व मुलांमध्ये खेळाच्या माध्यमातून आरोग्याचा त्यासोबतच राज्यातील प्रथम व देशातील आठव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावाजल्या गेलेल्या नवी मुंबई शहराचे नामांकन उंचाविण्यासाठी स्वच्छ नवी मुंबई अभियानाचा प्रसार केला जातो आहे.
यामध्ये स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने “टाकाऊतून टिकाऊ” ही संकल्पना राबवत नवी मुंबई महानगरपालिका आणि ग्रीन सोसायटी फोरम या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांच्या झाकणांपासून फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धा अविष्कृत करणारे “रिसायकलेडेलिक फिफा म्युरल” हे अभिनव शिल्प महापालिका मुख्यालयासमोर साकारण्यात आले आहे.
40 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद होणारी “फुटबॉल कार्निवल विथ वॉकेथॉन” प्रसंगी नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते, उप महापौर श्री. अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., ब प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. रुपाली किस्मत भगत, ड प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. संगीता बो-हाडे, जी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. संजू वाडे, आरोग्य समिती सभापती श्रीम. उषा भोईर, नगरसेवक श्री.गिरीश म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, मुख्य लेक्षा परीक्षक डॉ. सुहास शिंदे, शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर, सहा. संचालक नगररचना श्री. औवेस मोमीन, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाच्या उपआयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, इटीसी संचालक डॉ. वर्षा भगत तसेच ग्रीन सोसायटी फोरमचे बनॉय के, जसपालसिंग नोएल, किशोर बिश्वास आणि सहकारी उपस्थित होते.
यापूर्वीही टाकऊतून टिकाऊ ही संकल्पना राबवित ग्रीन सोसायटी फोरमने महापालिका मुख्यालयात संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्ड पासून भारताच्या नकाशाची शिल्पाकृती साकारली होती. ज्याला मदर इंडिया बोर्ड असे आकर्षक नाव देण्यात आले होते. त्याचेच पुढचे पाऊल टाकत या कलात्मक विचारांच्या समुहाने 7 हजार टाकून दिलेल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांची झाकणे शहरभर 5 दिवस फिरून जमा केली व त्यामधून दहा दिवसात फिफा स्पर्धेच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आकर्षक शिल्प साकारले आहे. साडेसहा फुट व्यासाचे हे वर्तुळाकार शिल्प 250 किलो वजनाचे आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शून्य कचरा ही संकल्पना प्रत्यक्षात आणत पर्यावरणशील स्मार्ट कलात्मक शहर ही नवी मुंबईची ओळख या शिल्पामधून निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या शिल्पाच्या माध्यमातून मानवी वर्तनात पर्यावरणपूरक बदल घडावा यासाठी एका बाजुने प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे व दुस-या बाजुला टाकाऊ प्लास्टिकचे अशाप्रकारे कला स्वरुपात रुपांतर करणे ही भूमिका नजरेसमोर ठेवून बनॉय के, मच्छिंद्र पाटील, जसपालसिंग नोएल, ऑल्वीन ऑगस्टीन यांच्या संकल्पनेतून कलादिग्दर्शक श्री. किशोर विश्वास यांच्यासह त्यांचे सहकारी सद्दाम हुसेन तसेच निखिलकुमार, डॉन वारके, नहीद अहमद, गफूर एम, विजयन के, मोहम्मद आरीफ, हरपल नॉएल, अली अझीयार यांनी मेहनतीने फुटबॉलचा प्रचार करणारे हे कलात्मक शिल्प साकारले आहे.
पामबीच मार्गाच्या किल्ले गावठाण जंक्शनवरच ग्रीन बिल्डींग म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबईच्या आयकॉनीक महापालिका मुख्यालायासमोर पर्यावरणपुरक संदेश देणारे हे शिल्प साकारल्यामुळे महापौर, आयुक्तांसह सर्वच मान्यवरांनी या शिल्पाकृतीचे कौतुक केले तसेच पामबीच मार्गांवरून ये-जा करणारे नागरिकही त्याठिकाणी थांबून शिल्पासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत.