निलेश मोरे
नागरिकांच्या तक्रारीकडे एल वार्ड पालिकेचे दुर्लक्ष
मुंबई : मुंबई उपनगरातील घाटकोपरच्या असल्फा येथील सुंदरबाग झोपडपट्टीत गेल्या नऊ माहिन्यापासून नळातून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील नागरिक विविध आजारांचा सामना करत आहेत. असल्फा व्हिलेज, नेताजी पालकर मार्गावरील असलेल्या सुंदरबाग झोपडपट्टीत एकूण १५० घरे असून ७५० कुटुंब राहतात. या झोपडपट्टीला पाणी पुरवठा होणार्या नळाच्या पाईप लाईन ३५ वर्ष जुन्या झाल्या असून काही पाण्याच्या लाईन बेकायदेशीर बसवण्यात आल्या आहेत. या बेकायदेशीर पाईप लाईन द्वारे रोज लाखो लिटर पाणी चोरी होत असल्याचे येथील स्थानिक रहिवाशी अविनाश जोशी यांनी एल वार्ड पालिकेला तक्रार पत्राद्वारे कळवून देखील पालिकेचे अधिकारी पोपटराव यांनी एक दोनदा येथील झोपडपट्टीला भेट देत बेकायदेशीर पाईप लाईन लाकडी खुंटे लावून बंद केले, मात्र खुंटे पाण्यामुळे फार काळ टिकत नसल्याने त्यातून पुन्हा सांडपाणी निर्मळ पाणी वाहून नेणार्या पाईप लाईन मधून शिरत असल्याने घरातील नळ रहिवाशीनी चालू केले असता त्यातून शौचालयातील सांडपाण्यासारखा उग्र वास येत असून येथील रहिवाशांना सांडपाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यापासून सतत येथील रहिवाशाना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
रहिवाशी पिण्याच्या पाण्याच्या बिस्लरी विकत आणत असल्याचे तक्रारदार अविनाश जोशी यांनी सांगितले. तसेच येथील रहिवाशी अविनाश जोशी यांनी एल वार्ड पालिकेला पुन्हा पत्रव्यवहार करून या झोपडपट्टीतील बेकायदेशीर पाईप लाईन कायमस्वरूपी बंद कराव्या अशी मागणी झोपडपट्टीतील रहिवाशांच्या वतीने करण्यात आली आहे . या दूषित पाण्यामुळे तक्रारदार येथील रहिवाशी अविनाश जोशी यांच्या कुटुंबातील त्यांचे बंधू दिपक जोशी ( ४२ ) ओमकार जोशी ( ७ ) मानसी जोशी ( ७ ) यांना या पाण्यामुळे वायरल ताप आल्याने त्यांना घाटकोपरच्या मुक्ताबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तसेच या सुंदरबाग झोपडपट्टीत ५० हुन अधिक रहिवाशी या पाण्यामुळे आजारी पडल्याचे अविनाश जोशी यांनी सांगितले.