स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ९६१९१९७४४४
मुंबई : हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज मंत्रालयात त्रिमुर्ती सभागृहात पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. नागरिकांनी निरोगी व प्रदुषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर ज्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे प्रदुषण वाढते, त्याचा वापर टाळायला हवा. पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड तरी लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. वर्षभरातील सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचे प्रदुषण, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
प्रारंभी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी फटाक्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी प्रदुषण संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना तावडे त्यांनी उत्तरे दिली.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रास्ताविकात सांगितले, देशातील भावी पीढीला पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्यावर शाळेतच पर्यावरणाचे रक्षण करण्याचे संस्कार झाले पाहिजे. दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर करु नये. येणारी दिवाळी ही प्रदूषणमुक्त साजरी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली. यावेळी उपस्थित असलेल्या हंसराज मोरारजी पब्लिकस्कूल, कुलाबा म्युनिसिपल स्कूल आणि युरो स्कुलच्या मुख्याध्यापकांचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.
या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव सतीश गवई, सदस्य सचिव डॉ.पी.अनबलगन, तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.