स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ९६१९१९७४४४
ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपकडून बोगस आकड्यांचा प्रपोगंडा
मुंबई : काल राज्यातील ३१३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणूक निकालात जनतेने भाजपाला स्पष्टपणे नाकारले असताना भाजपकडून मात्र ‘गिरे तो भी टांग उपर’ या नितीने बोगस आकड्यांचा प्रपोगंडा करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले काँग्रेस पक्षाने या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले असून या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा क्रमांक १ चा पक्ष राहिलेला आहे. १६ जिल्ह्यातील ३१३१ ग्रामपंचायती पैकी १०६३ ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाची सत्ता आली असून भाजपाला केवळ ८१३ ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे. त्याच सोबत राष्ट्रवादी काँग्रेसने ८३४ तर शिवसेना व अपक्ष यांनी ४२१ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने त्यांच्या ‘खोटं बोला पण रेटून बोला’ या परंपरेला साजेसं काम करीत काल विजयाचे खोटे आकडे माध्यमांसमोर मांडून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा व राज्याचा कारभार सुरळीत राखण्यात पुर्णतः अपयशी ठरले आहे. संपुर्ण देशभरात या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व पोकळ घोषणांमुळे मंदीचे सावट पसरले आहे. एकीकडे प्रचंड महागाई ,शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या, वाढत चाललेली बेरोजगारी यातून सरकार विरोधी पसरत असलेली नाराजी या वातावरणातून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काल भाजपाकडून निकालाची खोटी आकडेवारी पसरवून जनता अजून आपल्या सोबत आहे हे दाखविण्याचा पोरकटपणा करण्यात आला आहे.
भाजपकडून सातत्याने खोटेपणाचा कळस गाठला जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली परंतु आजतागायत १ रुपयांचीही कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. परिणामी अजूनही शेतकरी आत्महत्या चालूच आहेत. ग्रामीण युवक शेतीही नाही व रोजगारही नाही या असंतोषात फिरत आहे.
या निवडणुकीतही भाजपकडून सत्ता व पैशाचा वापर करण्यात आला परंतु या दोन्ही गोष्टी भाजपकडे असतानाही भाजपाला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. पक्षाचे हे अपयश झाकण्यासाठी भाजप नेत्यांकडून खोटे आकडेवारी माध्यमांसमोर मांडून जनता आपल्या सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अशा खोट्या आकडेवारीमुळे जनतेवर याचा परिणाम होणार नाही. जनतेने भाजपाचा खोटेपणा ओळखला असून भाजपचा आता काऊंट डाऊन सुरु झाला आहे.
काँग्रेस पक्ष, ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विजयाची हीच परंपरा कायम राखून पुढे होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही बाजी मारेल असा असा विश्वास राजू वाघमारे यांनी व्यक्त केला.