स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठ परिसरात एल मार्केट तसेच अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्ससमोरील ज्येष्ठ नागरिकांच्या बाकड्यावर दारू पिण्याचे कार्यक्रम उघड्यावरच होवू लागल्यामुळे नेरूळ पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या ठराविक भागात विस्तारलेले आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या तुलनेत उपलब्ध पोलीसी मनुष्यबळ तुटपुंजे असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नेरूळ पोलीस ठाणे कार्यक्षेत्राच्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ कमी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
नेरूळ सेक्टर आठ परिसरात रात्रीच्या अंधारात सार्वजनिक जागी दारूच्या पार्ट्या सर्रास होवू लागल्याने स्थानिक रहीवाशांकडून नाराजीचा सूर आळविण्यात येवू लागला आहे. नेरूळ सेक्टर आठ परिसरातील एल मार्केटच्या आवारात चहावाल्या टमटमची जागा आणि त्या ठिकाणी असलेल्या बिअर बारच्या मागील बाजूस खुलेआमपणे रात्री-अपरात्री उशिरापर्यत दारूच्या पार्ट्या होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यात वाढीस लागले आहे. एल मार्केट परिसरातच उघड्यावर दारू पिणे आणि गोंधळ घालणे असेही प्रकार संबंधित मद्यपि टोळक्याकडून होवू लागले आहे. नेरूळ पोलिसांनी दररोज एल मार्केट परिसरातील चहाच्या टमटमची टपरीची जागा व बिअर बारच्या मागील बाजूची जागा या ठिकाणी दररोज धाडी टाकल्यास या मद्यपि टोळक्यांची समस्या कायमस्वरूपी संपुष्ठात येईल, असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्ससमोरील उद्यान आणि महापालिकेच्या ग्रंथालयाच्या लगत असलेल्या जागेत बाकडे टाकून ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्या ठिकाणी रात्री ११ नंतर उघडपणे दारू पिण्याचे कार्यक्रम होवू लागले आहेत. अनेकदा लगतच्या चायनीजच्या टापरीवरून येणारी मंडळीदेखील त्या ठिकाणीच दारूच्या पार्ट्या करत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्री (दि. १० ऑक्टोबर) उशिरापर्यतही ज्येष्ठांच्या बाकड्यावर दारूची पार्टी उघड्यावर सुरुच होती. एल मार्केट आवारात व अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्ससमोरील ज्येष्ठ नागरिकांच्या बाकड्यांवर रात्री-अपरात्री उशिरापर्यत दारूच्या पार्ट्या आणि त्यानंतर गोंधळ होत असल्याने स्थानिक परिसरातील शांततेला अडथळे निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. पोलिसांनी दररोजची गस्त घालताना या दोन ठिकाणची झाडाझडती घेतल्यास संबंधित समस्या संपुष्ठात येइर्रल, असा आशावाद स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.