स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : जुईनगरमधील उद्यानाच्या नामफलकावरून निर्माण झालेला जातीय तणाव पाहता महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने गुरूवारी दुपारी २ वाजता पोलिस बंदोबस्तात तो फलक हटविला. विशेष म्हणजे अवघ्या मिनिटभराच्या कारवाईकरताही त्या ठिकाणी आलेले महापालिका कर्मचारी व अधिकारी कमालीचे तणावाखाली असलेले पहावयास मिळाले.
जुईनगरमधील उद्यानाला पालिका प्रशासनदरबारी नाव संमत होण्यापूर्वीच स्थानिक आंबेडकरी जनतेने त्या उद्यानाला माता रमाई आंबेडकर उद्यान असे नाव दिले होते. या परिसरात आंबेडकरी समाजाची लोकसंख्या लक्षणीय असल्याने जनतेने उत्स्फूर्तपणे या उद्यानाला माता रमाई आंबेडकर उद्यान असा नामफलकही लावला होता. परंतु स्थानिक नगरसेवकाने या उद्यानाला दुसरेच नाव महापालिका प्रशासन दरबारी मंजुर करवून घेतले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी या उद्यानाच्या ठिकाणी आली. मागोमाग पोलिसांची सुमो व्हॅनही आली. अतिक्रमणचे साहीत्य घेवून महिद्रा पिकअप व्हॅनही आले. महापालिका कर्मचारी पोलिस बंदोबस्त असतानाही सभोवताली पाहणी करत होते. काही सेंकदात तो फलक हटविण्यात आला असला तरी फलक सावकाश काढा, जपून काढा अशा सूचना करणारे अतिक्रमणे पालिका उपायुक्तही काही काळ तणावाखाली पहावयास मिळाले. फलक काढताना एका पालिका कर्मचार्यासह नेरूळ विभाग कार्यालयातील एक कंत्राटी कामगारही आपल्या मोबाईलमधून फलक काढताना फोटो काढण्यात व्यस्त असलेला पहावयास मिळाला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उद्यानाला लावलेला अनधिकृत फलक आता हटविल्याने आता त्या ठिकाणी अधिकृत फलक लागलेला पहावयास मिळेल. मात्र त्या परिसरात असलेल्या आंबेडकरी जनतेचे प्राबल्य पाहता आगामी निवडणूकांमध्ये हा फलक मुद्दा कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.