स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : फिफा अंडर-१७ जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यांसाठी शहर स्वच्छ, सुंदर आणि खड्डेमुक्त दिसावे म्हणून महापालिकेने डॉ.डी.वाय.पाटील स्टेडीयम लगत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू वाशी येथील ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत त्या परिसरात सुमारे १४ कोटींहून अधिक रुपये विकासकामांच्या आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली खर्च केले आहेत. यातील बहुतेक सर्वच कामे विनाटेंडर झाली असून या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी मनसेचे सविनय म्हात्रे यांनी मुख्यमंत्री, नगर रचना सचिव आणि मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच आजतागायत फिफावर मनपा तर्फे करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील, वर्क ऑर्डर मनपाच्या संकेतस्थळावर टाकण्यात याव्यात अशी मागणी देखील मनसेने केली आहे. अन्यथा शहर अभियंता मोहन डगावकर यांच्या दालनात फुटबॉल खेळून तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
दि.०६ ऑक्टोबर २०१७ पासून डॉ.डी.वाय.पाटील स्टेडीयममध्ये हे सामने होत आहेत. दि.०६ ऑक्टोबर आणि दि.०९ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक फुटबॉल प्रेमी प्रेक्षकांनी पाठ फिरवली असून, फिफाच्या नावावर अभियंत्यांनी स्वतःचे खिसे भरून घेतले की काय असा संशय मनसेने व्यक्त केला आहे. रस्त्यांची डागडुजी, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणावर हा १४ कोटींचा करदात्यांचा पैसा खर्च करण्यात आला आहे. तसेच खेळाडूंच्या सरावासाठी आणि सामने पाह्ण्यासाठी येणार्या प्रेक्षकांच्या वाहन पार्किंगसाठी एकूण पाच मैदाने विकसित केली गेली आहेत. इतके करूनही स्टेडीयममध्ये उपस्थित प्रेक्षकांमध्ये जबरदस्तीने आणलेल्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीच संख्या जास्त होती. मग हा सगळा खटाटोप का असा सवाल मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केला आहे. फिफाच्या नावाखाली फक्त नेरूळ, वाशी परिसरातच विकासकामांसाठी दाखवलेली धडपड पाहता इतर वॉर्डातील व विभागातील करदाते कर देत नाहीत की काय असा उपरोधिक प्रश्नदेखील सविनय म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
एरवी महानगरपलिका शहर अंतर्गत रस्ते नीट करत नसताना यावेळी मात्र सायन पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मनपाचा निधी वापरून आयुक्त आणि शहर अभियंत्यांनी काय मिळवले असे मत मनसेने व्यक्त केले आहे.
फिफासाठी झालेल्या या कामांची सखोल चौकशी व्हावी व विनाटेंडर काम झाले असल्यास शहर अभियंता व संबंधित अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा शहर अभियंत्यांविरोधात आंदोलन छेडून त्यांच्या दालनात फुटबॉल खेळू असा इशारा मनसेचे सविनय म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.