स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात मूषक नियत्रंणचे काम करणार्या ५० कामगारांची आजही आर्थिक ससेहोलपट सुरूच आहे. दिवाळी आता तोंडावर आलेली असताना या कामगारांचे तीन महिन्याचे वेतन थकीत आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर होवून वेळेवर त्यांचे वेतन न मिळाल्यास महापालिका सभागृहात यापुढे महासभेदरम्यान जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होण्याचा इशारा गुरूवारी शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त व महापौरांना लेखी निवेदनातून दिला आहे.
महानगरपालिकेत ठेकेदाराच्या माध्यमातून ५० कंत्राटी कामगार मूषक नियत्रंण विभागात काम करत आहेत. या कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून वेतन विलंबाने मिळत आहे. दिवाळी आता अवघ्या आठ दिवसावर आलेली असताना या कामगारांना आजही तीन महिने वेतन मिळालेले नाही. दसरा सण नुकताच सर्वांनी उत्साहात केला. पण या कामगारांकडे तीन महिने वेतन रखडल्यामुळे पैसाच नसल्याने त्यांना हा सण साजरा करता आलेला नाही. तुटपुंज्या वेतनात त्यांना घरभाडे, मुलांचे शिक्षण, घरखर्च भागवावा लागत आहे. महापालिकेत अन्य सर्व कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेवर होत असताना फक्त आणि फक्त मूषक नियत्रंणच्याच कामगारांचे वेतन तीन महिने रखडलेले असते. हे चित्र आजचे नसून वर्षानुवर्ष हेच चित्र कायम असल्याचा ़संताप शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
पालिकेतील कायम कामगार, अधिकारी वर्ग, उपायुक्त यांचे तीन महिने वेतन थांबवून पाहा. लगेच कामबंद आंदोलन सुरू होईल. असे असतानाही हे गोरगरीब मूषक नियत्रंण कामगार पोटाला चिमटा मारून आपली सेवा वेतन रखडलेले असतानाही इमाने इतबारे करत आहे. पालिका प्रशासनाकडून तसेच ठेकेदाराकडून त्यांना कोणतीही आरोग्य सुविधा तसेच मूषक मारण्यासाठीचे साहीत्य उपलब्ध करून दिली जात नाही. उंदिर मारण्यासाठी काठी आणि उंदिर शोधण्यासाठी टॉर्च (बॅटरी)देखील मूषक नियत्रंणच्या कामगारांना स्वखर्चानेच आणावी लागत असल्याचे शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
दिवाळी चार दिवसावर आलेली असल्याने या कामगारांचे तीन महिन्याचे रखडलेले वेतन विनाविलंब देण्यात यावे. या कामगारांच्या वेतन विलंबाबाबत आपण चौकशी करून याबाबत आम्हाला लेखी माहिती मिळावी. या कामगारांवरील वेतन विलंबाबाबतचा अन्याय यापुढेही कायम राहील्यास महापालिका सभागृहात महासभेदरम्यान या कामगारांच्या समस्येकडे आपले व नवी मुंबईचे लक्ष वेधण्यासाठी जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होवू असा इशारा शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त व महापौरांना लेखी निवेदनातून दिला आहे.